Pimpri News : कोविड चाचणी अहवाल नसल्याने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते कमलाकर झेंडे यांना नाकारला उपचार, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू

कोविड चाचणी अहवाल नसेल तर रुग्णालयात अन्य रुग्णांवरही उपचार केले जात नाहीत

एमपीसी न्यूज – रुग्णालयात रात्रीच्या वेळी दाखल होणाऱ्या  रुग्णांवर कोविड चाचणी अहवाल नसेल तर उपचार केले जात नाहीत. यामुळे अन्य आजार असलेल्या रुग्णांचे हाल होत आहेत. दोन खाजगी रुग्णालयांनी कोविड रिपोर्ट नसल्याने एका रुग्णाला दाखल करून घेण्यास नकार दिला. तर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रात्री रुग्णाला दाखल करून घेतले, मात्र सकाळी कोविड चाचणी करून रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचार होणार असल्याचे सांगण्यात आले.

या दरम्यान उपचार मिळण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते कमलाकर झेंडे (वय 68) यांच्या बाबतीत हा प्रसंग घडला आहे. कमलाकर झेंडे यांचे बुधवारी (दि. 14) सकाळी निधन झाले.

कमलाकर झेंडे यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. झेंडे यांना शुगरचा त्रास होता. शुगर वाढल्याने मंगळवारी रात्री त्यांची प्रकृती बिघडली. सुरुवातीला गोळ्या देऊन प्राथमिक उपचार केले. मात्र त्याचा फरक न पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यांना शहरातील दोन खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन्ही रुग्णालयांनी त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले नाही.

३४पहिल्या हॉस्पिटलने रात्री अकरा वाजता कोविड  टेस्ट करण्यास सांगितले. त्यानंतर दाखल करून घेण्यात येईल असे सांगितले. परंतु रात्री अकरा वाजता कुठे टेस्ट करणार हा प्रश्न होता. दुस-या रुग्णालयातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयार नव्हते. प्राथमिक तपासणी केली त्यात रुग्णाची ऑक्सिजन पातळी खूप कमी झाली आहे आणि कोविड टेस्ट रिपोर्ट नाही, त्यामुळे त्यांना दाखल करून घेणार नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले असल्याचे कमलाकर झेंडे यांच्या कन्या प्रीती राऊत यांनी सांगितले.

प्रीती म्हणाल्या, “आम्ही वडिलांना बुधवारी पहाटे एक वाजता पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र बुधवारी सकाळी कोविड टेस्ट केल्यानंतरच पुढील उपचार होतील असे वायसीएम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यांना वायसीएम रुग्णालयात दाखल करून आम्ही दोन वाजता घरी आलो आणि पहाटे तीन वाजता त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याचे एका नर्सने आम्हाला फोन करून सांगितले. इथला ऑक्सिजन संपला आहे. तुम्ही पेशंटला दुसरीकडे दाखल करा असेही फोनवरील नर्सने सांगितल्याचे प्रीती म्हणाल्या.

त्यानंतर नातेवाईकांनी स्थानिक नगरसेवकांशी संपर्क करून माहिती दिली. नगरसेवकांनी सांगितल्यानंतर झेंडे यांच्यावर उपचार केले गेले. मात्र बुधवारी सकाळी झेंडे यांचे निधन झाले. रात्रभर त्यांना फक्त ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. शुगरशी संबंधित कोणतेच उपचार त्यांच्यावर केले नाहीत. वेळेत डॉक्टर आले असते आणि उपचार मिळाले असते तर झेंडे वाचले असते. रुग्णालयांच्या हलगर्जीपणामुळे आमचा आधार गेला. प्रत्येक रुग्णालयाला कोविड टेस्ट रिपोर्ट हवा आहे. मध्यरात्री कुठेही टेस्ट होत नाही. मग रिपोर्ट कुठून आणणार. या सगळ्या परिस्थितीमुळे झेंडे यांना वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रीती यांनी सांगितले.

कमलाकर झेंडे यांनी पुणे-मुंबई सायकल स्पर्धा पाच वेळा जिंकली आहे. त्यांना राष्ट्रीय सायकल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले आहे. त्यांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. त्यांना ‘घाटांचा राजा’ म्हणून ओळखले जात.

यामुळे पिंपरी चिंचवड शहरात कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर 24×7 पालिकेच्या दवाखान्यात असणे गरजेचे आहे. यामुळे रुग्णांची परवड होणार नाही.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख म्हणाले, “झेंडे यांच्या कुटुंबाकडून करण्यात आलेल्या तक्रारीबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केली जाईल. झेंडे यांच्यावर कोणते उपचार झाले. त्यांची प्रकृती अस्वास्थ्य याबाबत देखील माहिती घेतली जाईल.”

वायसीएम हॉस्पिटलचे डीन डॉ. राजेंद्र वाबळे म्हणाले, “रुग्णाला वायसीएम रुग्णालयात आणल्यानंतर ऑक्सिजन लावण्यात आला होता. मात्र त्यांना घरी घेऊन जाण्याबाबत कुटुंबियांना कोणी माहिती दिली याची चौकशी सुरू आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.