Wakad Crime News : फ्लॅटच्या व्यवहारातून वाद; शिवसेनेच्या नगरसेवकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – फ्लॅटच्या व्यवहारातून वाद झाला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 26) वाकड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात तक्रार करण्यात आली. यातील एका प्रकरणात शिवसेनेच्या नगरसेवकावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच्या परस्पर विरोधात संबंधित व्यक्तीच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रितेश प्रकाश दुगड (वय 49, रा. मित्रमंडळ चौक, पर्वती, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, शिवसेनेचे नगरसेवक नीलेश हिरामण बारणे, तसेच अविनाश लाला बारणे (वय 44), महेश हिरामण बारणे (तिघेही रा. थेरगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक नीलेश बारणे, तसेच अविनाश बारणे व महेश बारणे यांच्या भागीदारीतील समर्थ लॅंडमार्क या संस्थेच्या थेरगाव येथील गृहप्रकल्पात फिर्यादी प्रितेश दुगड यांनी स्वत: एक फ्लॅट तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे देखील एक फ्लॅट असे दोन फ्लॅट खरेदी केले. त्यानंतर फिर्यादीने दोन्ही फ्लॅटचा ताबा मागितला असता, ताबा दिला नाही तसेच समर्थ लॅंडमार्कच्या भागीदारांनी गृहप्रकल्पातील सर्व फ्लॅट बँकेकडे गहाण ठेवून पाच व सात कोटी रुपये कर्ज घेतले. मात्र या फ्लॅटवर कोणताही बोजा नाही, असे सांगून फिर्यादी व त्यांच्या पत्नीला फ्लॅटची विक्री केली. मात्र फ्लॅटचा ताबा न देता तसेच फिर्यादीचे पैसे परत न करता फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात अविनाश लाला बारणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार प्रितेश प्रकाश दुगड यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रितेश दुगड यांनी शांताई पार्क, थेरगाव या प्रोजेक्टमध्ये 49 लाख 67 हजार 700 रुपयांना फ्लॅट खरेदी केले. त्या फ्लॅटचा ताबा वेळेवर दिला नाही, तसेच गृहप्रकल्पावर बँकेकडून कर्ज काढले. या कारणावरून प्रितेश दुगड यांनी फ्लॅटचा ताबा घेण्यास नकार दिला तसेच फिर्यादी अविनाश बारणे यांच्याकडे दीड कोटी रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर पोलिसांत तक्रार करण्याची धमकी प्रितेश दुगड यांनी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.