Pune news: राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने महायज्ञ

एमपीसी न्यूज : बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर वारंवार अपघात होत असून याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतार आहे, यामुळे वाहने वेगाने जात असतात परंतु या वाहनाच्या वेगांवर कोणतीच मर्यादा न ठेवल्यामुळे सातत्याने अपघतात वाढ होत आहे. 

त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या आठवड्यात या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे तरी प्रशासनाला जाग आली नाही, त्यामुळे शिवसेना खडकवासला मतदार संघाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग, नऱ्हे येथील सर्व्हिस रस्त्याजवळ महायज्ञ करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला.

शिवसेना विभाग प्रमुख नीलेश गिरमे म्हणाले, या प्रश्नासंदर्भात काल पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अनेकांनी भाषणे केली, उपाय योजना सुचविल्या परंतु यावर आतापर्यंत कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. गेल्या वर्षी मुंबई-बेंगळुरु महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर देखील धायरी परिसरातील नागरिक, राष्ट्रीय महामार्ग, वाहतूक पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्यासोबत अपघात रोखण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.

परंतु त्या वेळी देखील तात्पुरत्या स्वरूपात उपाय योजना करण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतर येथील परिस्थिती जैसे थे झाली आणि पुन्हा अपघातची मालिका सुरू झाली आहे. या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अजून किती नागरिकांचा बळी घेतला जाणार आहे, हे अपघाताचे सत्र थांबणे गरजेचे आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही याठिकाणी महायज्ञ केला आहे.

या ठिकाणी अपघात होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असून त्यावर तात्काळ उपयोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेग मर्यादा ८० वरून ४० प्रति तास करण्यात यावी, तसेच त्याचे फलक लावण्यात यावेत, स्टड लाईट बसवावेत तसेच विविध ठिकाणी रम्बल स्ट्रीप, सोलर बिल्कर् देखील लावण्यात यावेत, कर्ब पेंटिंग करावे, वाहन चालकांना ड्रिंक अँड ड्राईव्ह, गो स्लोव, अपघात प्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालावा अश्या सूचना देणारे फलक लावण्यात यावेत. आणि याची नेहमी दुरुस्ती आणि देखभाल करण्यात यावे, तसेच महामार्गावर सातत्याने पडणारे खड्डे यावर ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

या ठिकाणी रखडलेली सर्व कामे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे, तसे न झाल्यास शिवसेनेच्या वतीने वारजे येथील कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नीलेश गिरमे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.