Talegoan : भावी पिढी ध्येयवादीने उभी करण्याकरीता शिवशंभू स्मारक हे प्रेरक : माजी आमदार कृष्णराव भेगडे

एमपीसी न्यूज – भविष्यात भावी पिढी ही ध्येयवादीने उभी करण्याकरीता तळेगावात साकार होणारे हे स्मारक हे सदैव चांगल्या कार्याला प्रेरित व मार्गदर्शन करीत राहील असा विश्वास वाटतो. असे प्रतिपादन माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी केले.

छत्रपती शिवशंभू स्मारक समिती व लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान, मावळ यांच्या संयुक्त सहकार्याने ‘जाणता राजा महानाट्य भूमीपूजन’ कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी श्रीमंत सरदार अंजली राजे दाभाडे सरकार, स्वागताध्यक्ष आमदार संजय (बाळा) भेगडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे, केशवराव वाडेकर, बाळासाहेब जांभुळकर, पी. डी. सी. सी. बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, ह. भ. प. नितीन महाराज काकडे, ह. भ. प. माऊली दाभाडे, ह. भ. प. जालिंदर काळोखे, रा. स्व. संघाचे पुणे जिल्हा कार्यवाह अविनाश भेगडे, संस्थेचे अध्यक्ष संतोष भेगडे पाटील व लोकनेते स्व. गोपिनाथराव मुंडे प्रतिष्ठानचे संस्थापक सुनील शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील शेळके यांनी केले. महानाट्याच्या आयोजनामागील भुमीका देवराई संस्थेचे संस्थापक गिरीश खेर यांनी विशद केली.

 मा. आमदार कृष्णराव भेगडे पुढे म्हणाले, ‘तळेगावची भूमी ही ऐतिहासिक व सांस्कृतिक आहे. छत्रपतींच्या बारा मावळांपैकी पवन, नाणे व आंदर मावळ याच तालुक्यात आहे. येथील असणारे किल्ले हे पराक्रमाची यशोगाथा पिढीला समजला गेला पाहिजे. छत्रपतींच्या तीन पिढ्यांकरिता दाभाडे सरदार घराण्यांनी दिलेले योगदान हे निश्चितच भावी पिढीसाठी प्रेरक आहे. अराजकता व अपप्रवृत्ती याविरूद्ध लढण्याचे सामर्थ्य हे इतिहासातून मिळत असते. सरदार दाभाडे घराण्याचा उज्वल पराक्रमाचा इतिहास हा तळेगावात प्रदर्शन किंवा म्युरल्सच्या रूपाने तयार व्हावा याकरिता सर्वांनी प्रयत्न करावेत. तळेगावाचा समग्र इतिहास लेखनाचे कार्य हे पुर्णत्वाला जात असून तो दोन खंडात प्रसिद्ध होणार आहे. सरदार अंजली राजे दाभाडे सरकार यांनी स्मारकाविषयी विचार मांडले.

 उद्योजक रामदास काकडे भाषणात म्हणाले, ‘येणाऱ्या पिढीला शिवचरित्र हे मार्गदर्शन करील, खंडेराव दाभाडे व सरसेनापती उमाबाई दाभाडे यांनी पराक्रमाचा जोरावर मावळचा इतिहास व गुजरात व माळव्यापर्यंत पोहचविला आहे. छत्रपती शिवरायांनी देशप्रेम व भारतीय संस्कृती करिता लोकांना संघटित केलेले होते. त्यांचे राज्य हे धर्म संस्कृती टिकविण्याकरिता संघर्ष करीत होते. मावळच्या ऐतिहासिक भूमीत साकार होणारे हे तीर्थ आदर्शाच्या शोधात असणाऱ्या तरूणांना जीवनाचा मार्ग दाखविण्यास मदत करेल असा विश्वास वाटतो.

 स्वागताध्यक्ष आमदार संजय (बाळा) भेगडे भाषणात म्हणाले, ‘लोकसहभागातून महानाट्य जाणता राजाच्या प्रयोगातून या तीर्थाची उभारणी होत आहे. दहा वर्षांपासून स्मारकाच्या उभारणीकरता सर्व कार्यकर्ते या उदात्त कार्यकरीता प्रयत्नशील आहेत. मावळचा प्रेरणादायक इतिहास या तीर्थाच्या रूपाने सतत स्मरणात राहील. या मंगलदायी कार्यात सर्वांनी आपल्या परीने सहकार्याचा व मदतीचा वाटा उचलावा असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत मेढी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता संजय बावीसकर, चिराग खांडगे, राजेश सरोदे, दिपक बीचे सर, युवराज काकडे, विजय काळोखे, विनय सोरटे, प्रसाद कुऱ्हे, विनायक भेगडे, प्रतिक भेगडे, मनीष रिकामे, नितीन पाडळकर, गणेश निसाळ यांनी सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.