Pune News : फक्त पंचवीस लोकांच्या उपस्थितीतच शिवस्मारकाचे लोकार्पण; राष्ट्रवादी काँग्रेसने दिला ‘हा’ इशारा

एमपीसी न्यूज – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे लोकार्पण होणार आहे. येत्या रविवारी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दरम्यान या स्मारकाच्या अनावरण प्रसंगी फक्त पंचवीस लोकांनाच परवानगी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याच विषयावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यात रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, फक्त पंचवीस लोकांच्या उपस्थितीत या स्मारकाचे अनावरण करणे हा महाराजांचा अपमान आहे. स्मारकाचा लोकार्पण सोहळा पुणेकरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य होणे आवश्यक आहे. मात्र भाजप केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा आयोजित करून महाराजांचा अपमान करत आहे. भाजपने घेतलेला हा निर्णय बदलला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सहा मार्चला रस्त्यावर उतरून निषेध करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. मोदी यांच्या पुणे दौऱ्यात शिवस्मारकाचे अनावरण, पुणे मेट्रो चे उद्घाटन आणि इतर काही कार्यक्रम संपन्न होणार आहे. दरम्यान यापूर्वी काँग्रेसने मोदींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे, तर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा निषेध आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.