Chikhali News : धक्कादायक ! वॉरंट पोचविण्यासाठी गेलेल्या दिल्ली पोलिसांना मिरची पूड डोळ्यात टाकून मारहाण

एकाला अटक

एमपीसी न्यूज – नवी दिल्ली येथे दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात पटियाला हाऊस कोर्टाने एका आरोपीला नॉनबेलेबल वॉरंट बजावले. त्या गुन्ह्यातील आरोपी चिखली परिसरात राहत असल्याने आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली पोलीस आरोपीच्या चिखली येथील घरी गेले असता आरोपीच्या नातेवाईकांनी पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्या सहकारी पोलिसांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून मारहाण केली. हा प्रकार बुधवारी (दि. 16) दुपारी पावणे तीन ते चार या कालावधीत रामदासनगर, चिखली येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

संदीप रामदास साबळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह कमल रामदास साबळे, सुनीता संदीप साबळे, सरिता दीपक साबळे (सर्व रा. रामदासनगर,चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक नरेंदरकुमार नंदलाल सहरावत (वय 39, रा. नवी दिल्ली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी सन 2019 मध्ये नवी दिल्ली येथील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी दीपक साबळे याला पटियाला हाऊस कोर्टाने नॉनबेलेबल वॉरंट बजावले आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी दीपक साबळे हा चिखली परिसरात राहतो.

त्यामुळे नवी दिल्ली पोलीस दलातील स्पेशल स्टाफमध्ये कार्यरत असलेले फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक नरेंदरकुमार सहरावत यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस पथक न्यायालयाने बजावलेले वॉरंट बजावण्यासाठी दिल्लीहून आरोपी दीपक याच्या घरी आले. त्यावेळी दीपकचे नातेवाईक आरोपी संदीप, कमल, सरिता, सुनीता यांनी आपसात संगनमत करून फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी दीपक याचा काहीही ठावठिकाणा सांगितला नाही.

तसेच घराचे लोखंडी गेट जोरात ओढून घेतले. त्यात फिर्यादी उपनिरीक्षक सहरावत यांच्या उजव्या हाताची बोटे गेटमध्ये अडकून दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी उपनिरीक्षक सहरावत यांच्या डाव्या हाताची बोटे पिरगळुन डोक्यात बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आरोपींनी फिर्यादी उपनिरीक्षक सहरावत आणि त्यांचे सहकारी संजीव यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

चिखली पोलिसांनी याबाबत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करत संदीप साबळे याला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.