धक्कादायक ! भारतात गेल्या वर्षात 21 टक्के बालमृत्यू केवळ हवा प्रदूषणामुळे

एमपीसी न्यूज – मागील वर्षी भारतात झालेल्या बालमृत्यूंपैकी 21 टक्के बालमृत्यू केवळ हवा प्रदूषणामुळे झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने पीएम 2.5 ची ठरवलेली पातळी भारतातील हवा प्रदूषणाने ओलांडली आहे. त्यामुळे भारतातील सर्व नागरिक धोक्याच्या पातळीत राहत आहेत.

भारतात एक लाख 16 हजार नवजात बालकांचा पहिल्याच महिन्यात हवा प्रदूषणामुळे मृत्यू होतो. अशी धक्कादायक माहिती द स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2020 ने जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे.

कोरोना विषाणू आणि हवा प्रदूषण या दोन्हींचा शरीराच्या विशिष्ट भागावर प्रभाव पडतो. सध्या कोरोना साथीचा काळ सुरु असताना हवा प्रदूषणाच्या गंभीर समस्येची माहिती समोर आली आहे. हिवाळ्याच्या दिवसात हवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

जगात चार लाख 76 हजार नवजात बालकांचा हवा प्रदूषणामुळे मागील वर्षी मृत्यू झाला. हे प्रमाण 20 टक्के एवढे आहे. भारतात एक लाख 16 हजार नवजात बालकांचा मृत्यू झाला असून भारतातील हे प्रमाण 21 टक्के एवढे आहे. बांगलादेशमध्ये 10 हजार 500, पाकिस्तान 56 हजार 500 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही देशातील हे प्रमाण 20 टक्के एवढे आहे. तर नेपाळमध्ये 22 टक्के नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये 2 हजार 550 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.

भारतात 2019 या साली 16 लाख 70 हजार जणांचा मृत्यू हृदयाशी संबंधित आजाराने झाला आहे. यासाठी खराब हवा हेच महत्त्वाचे कारण आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित असलेल्या 10 देशांमध्ये दक्षिण आशियातील भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ हे चार देश आहेत.

दिलासादायक बाब अशी की, घरातील वायू प्रदूषणाचे प्रमाण मागील नऊ वर्षांच्या तुलनेत 2019 साली 12 टक्क्यांनी कमी झाले आहे. 2010 साली 73 टक्के असलेले हे प्रमाण 2019 साली 61 टक्क्यांवर आले आहे. तरीही हवा प्रदूषणामुळे होणा-या मृत्यूचा धोका भारतात कायम आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.