Chinchwad News : धक्कादायक ! शहरात खुनी हल्ल्यांमध्ये वाढ; वर्षभरात 307 च्या 122 घटना

एमपीसी न्यूज – जुनी भांडणे, आर्थिक वाद, नातेसंबंध, प्रेम, वर्चस्ववाद, हप्तेखोरी अशा विविध कारणांवरून भांडणे होतात. वाद विकोपाला जातो आणि त्यातूनच शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी करण्यापर्यंत मजल जाते. अशा प्रकारच्या खुनी हल्ल्याच्या घटना शहरात वाढल्या आहेत. सन 2020 च्या तुलनेत सन 2021 या वर्षात खुनी हल्ल्याच्या घटना जवळपास दुप्पट झाल्या आहेत.

शहराला गुन्हेगारी मुक्त करण्याचा पवित्रा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सुरुवातीलाच बोलून दाखवला. अवैध धंदे, व्हाईट कॉलर गुन्हेगारी आणि इतर गुन्ह्यांना आवर घालणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी बोलून दाखवला. मात्र झाले उलटेच. मागील वर्षभरात गुन्ह्यांची संख्या वाढली. स्ट्रीट क्राईम वाढला. सोनसाखळी चोरांपासून वाहन चोरांपर्यंत, भंगार चोरांपासून एटीएम चोरांपर्यंत अनेकांची इथे मजल वाढली. मात्र या गुन्ह्यांना रोखण्यात पोलिसांना अपयश आले.

सन 2020 मध्ये खुनी हल्ल्याच्या केवळ 66 घटना होत्या. त्यात मागील वर्षी सन 2021 मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षी हा आकडा 122 वर पोहोचला आहे. म्हणजेच खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. यामागे पोलिसांची काही तांत्रिक कारणे देखील असू शकतील. परंतु आकडेवारी मात्र भयानक आहे हे नक्की.

सन 2020 मध्ये कोरोना साथीमुळे टाळेबंदी होती. त्यामुळे अनेक दिवस नागरिक घराबाहेर पडले नाहीत. याचा परिणाम गुन्हेगारीवर झाला. सन 2020 मध्ये असे काही दिवस आले, ज्या दिवशी एकही गुन्हा दाखल झाला नाही. परंतु टाळेबंदी मधून शिथिलता मिळाल्यानंतर गुन्हेगारी आणि कुरापती मानसिकता बाहेर पडू लागल्या. जुने वाद उफाळून येऊ लागले. काही तत्कालीन कारणांवरून देखील खुनी हल्ले झाले आहेत.

सात जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना नेहरूनगर येथे घडली. चौघांनी एका मासे विक्रेत्याकडे खंडणी मागत त्याच्यावर खुनी हल्ला केला. चाकण येथे एका महिलेने दुस-या महिलेच्या पतीवर आपले प्रेम असल्याचे सांगत चाकूने वार करून महिलेच्या खुनाचा प्रयत्न केला. निगडी प्राधिकरण येथे सोनसाखळी चोरून जाणा-या चोरट्याचा पाठलाग करणा-या पोलिसावर चोरट्याने चाकूने वार करून पोलिसाच्या खुनाचा प्रयत्न केला. अशा विविध कारणांवरून खुनी हल्ले होत आहेत.

तळेगाव दाभाडे येथे ‘मी इथला भाई आहे’ असे म्हणत एकाला तलवारीने मारण्याचा प्रयत्न झाला. थेरगाव येथे दारू प्यायला पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात हातोडीने मारून तिचा खून करण्याचा पतीने प्रयत्न केला. दिघी येथे एका पोलिसाच्या खुनाचा प्रयत्न झाला. मारहाणीच्या गुन्ह्यात या पोलिसाने आपल्याला पकडले म्हणून एका टोळक्याने पोलिसावर दगडाने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षी फेब्रुवारी, मार्च, जुलै आणि नोव्हेंबर या महिन्यात खुनी हल्ल्याच्या सर्वाधिक घटना घडल्या.

वर्षभरात चार गुन्हे असे आहेत, जे तात्काळ दाखल झाले नाहीत. त्यामुळे खालील आकडेवारीमध्ये चार गुन्ह्यांची तफावत आहे.

वर्षभरात घडलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या घटना –
जानेवारी – 10
फेब्रुवारी – 12
मार्च – 15
एप्रिल – 7
मे – 9
जून – 9
जुलै – 13
ऑगस्ट – 6
सप्टेंबर – 7
ऑक्टोबर – 7
नोव्हेंबर – 14
डिसेंबर – 9

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.