Pune : सरकारी कामासाठी खेटे घालून कंटाळलेल्या महिलेचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन

एमपीसी न्यूज- ‘सरकारी काम अन सहा महिने थांब’ अशी म्हण प्रचलित आहे. सरकार दरबारी आपल्या कामासाठी खेटे घालून कंटाळलेल्या एका महिलेने आज पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगच्या आवारातील टॉवरवर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिची समजूत काढून तिला खाली उतरवल्यानंतर हे शोले स्टाइल नाट्य संपले. हा सर्व प्रकार आज, मंगळवारी सकाळी घडला. या महिलेचे समाजकल्याण खात्यामध्ये अनेक दिवसांपासून रेंगाळले असल्यामुळे संतापून या महिलेने हा प्रकार केला.

सोनूबाई य़ेवले असे टॉवरवर चढलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही महिला जळगाव येथील असून या महिलेचे समाजकल्याण कार्यालयात गेल्या 7 -8 वर्षांपासून काम रेंगाळलेले आहे. अनेकवेळा कामासाठी खेटे घालून देखील काम होत नसल्यामुळे कंटाळलेल्या सोनुबाई येवले यांनी अखेर सेंट्रल बिल्डिंगच्या आवारातील टॉवरवर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिली. अंदाजे ३० फुटापर्यंत ही महिला टॉवरवर चढली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या महिलेची समजूत काढून अखेर तिला खाली उतरवले. सोनुबाई येवले यांच्या शोले स्टाईल आंदोलनामुळे मात्र बघ्यांनी खुप गर्दी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.