Chakan : दुकानदाराची थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धमकी; ‘तुमच्या सारख्या भरपूर अधिकाऱ्यांना माझ्या पाया पडायला लावले आहे’

एमपीसी न्यूज – पूजा साहित्य भंडार असलेल्या एका दुकानदाराने त्याचे दुकान सुरू ठेवले. याबाबत पोलीस कारवाई करण्यासाठी गेले असता दुकानदाराने थेट पोलिसांना अरेरावी करत धमकी दिली. मी पंधरा वर्षांमध्ये तुमच्या सारख्या भरपूर अधिकाऱ्यांना माझ्या पाया पडायला लावले आहे, असे म्हणत दुकानदाराने पोलिसांच्या हातातील नियमांचे कागद हिसकावून फेकून दिले.

पोलिसांनी दुकानदाराला सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 25) दुपारी पाच वाजता वेदांत संकुलनच्या समोर पूजा साहित्य भंडार चाकण येथे घडली.

संजय रघुनाथ फुलवरे (वय 57, रा. वेदांत संकुल समोर, चाकण) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई विलास कांदे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकेंड लॉकडाउनच्या दिवशी अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या आदेशाची पोलिसांकडून अंमलबजावणी केली जात आहे. चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस नाईक डी के सातकर, पोलीस शिपाई विलास कांदे आणि त्यांचे सहकारी रविवारी चाकण परिसरात आस्थापना कारवाई आणि विनामास्क कारवाई करत होते. त्यावेळी वेदांत संकुलच्या समोर असलेले पूजा साहित्य भांडार पोलिसांना उघडे दिसले. दुकानात तीन ते चार व्यक्ती बसले होते. त्यामुळे पोलीस त्या दुकानावर कारवाई करण्यासाठी गेले.

पोलिसांनी दुकानदार आरोपी संजय याला दुकान बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर आरोपीने पोलिसांना अरेरावीची भाषा केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांना मी पंधरा वर्षांमध्ये तुमच्या सारख्या भरपूर अधिकाऱ्यांना माझ्या पाया पडायला लावले आहे, असे म्हटले.

पोलीस नाईक सातकर यांना तू माझी गेल्यावेळी पावती केलेली आहे. तुला बघून घेईल आणि फिर्यादी यांना मी चाकण गावचा स्थानिक रहिवासी असून मी पावती करणार नाही. मला सर्व नियम माहीत असून तुला काय करायचे आहे ते कर, असे म्हणत उद्धट वर्तन केले.

आरोपीने पोलिसांसोबत एकेरी वाच्यता करून आरडाओरडा करत दमदाटी केली. त्यावेळी पोलिसांनी शासन आदेशाची प्रत आरोपीला दाखवली. आरोपीने न पाहता आदेशाची प्रत पोलिसांच्या हातातून हिसकावून घेतली आणि फेकून दिली. याबाबत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी संजय याला अटक केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.