Pimpri : दसरा सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी 

एमपीसी न्यूज –   साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला दसरा सण. उत्साह, आनंद व मांगल्याचा दिवस. त्याच्या पूर्वतयारीत गुंतलेल्या नागरिकांमुळे आज  पिंपरी-चिंचवडची बाजारपेठ फुलली होती. झेंडुच्या फुलांसह ऊस, केळीची पाने यांना मोठी मागणी होती. 

सोने-चांदी, वाहनांची खरेदी-विक्री, कापड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणांत आर्थिक उलाढाल झाली. सायंकाळी बाजारपेठ खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीने फुलली होती.  दसऱ्याला पुजेसाठी लागणारी झेंडुची फुले, ऊस, आंब्याची पाने, तोरणमाळा यांना मागणी होती.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर खरेदीला महत्त्व असल्याने ग्राहकांनी गृहप्रकल्पांमध्ये सदनिकांचे बुकिंग केले आहे. वाहन खरेदीस इच्छुक असणा-यांनी दुचाकी, चारचाकी वाहनांचे बुकिंग करून ठेवले आहे. दस-याच्या दिवशी ते नवीन वाहन घरी आणण्याचे अनेकांचे नियोजन आहे. गृहप्रवेशासाठीही अनेकांनी हा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न केला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतरही बाजारपेठेत तेजी आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात विविध भागाातील दुचाकींच्या दालनात अनेकांनी वाहनांचे बुकिंग केले आहे. दस-याच्या अगोदर आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी होण्यासाठी काहींची धावपळ सुरू आहे. वाहनविक्रीच्या दालनात ग्राहकांची गर्दी दिसून येऊ लागली आहे, चारचाकी वाहन खरेदी करणा-या ग्राहकांचीही धावपळ दिसून येत आहे. ग्रुप बुकिंगवर सवलत असल्याने एकत्रितपणे एकाच वेळी दुचाकी खरेदी करणा-यांचे प्रमाण वाढले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.