IPS Krishna Prakash : आमदार पुत्राला अटक ते झाड फेकून आरोपी जेरबंद; कृष्णप्रकाश यांची अल्प तरीही चर्चेची कारकिर्द

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – अल्ट्रा मॅन, आर्यनमॅन अशी आंतराष्ट्रीय ख्याती असलेल्या तसेच, दबंग आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून पोलीस खात्यात ओळख असलेले कृष्णप्रकाश यांची पिंपरी चिंचवड आयुक्तपदावरून मुंबईत तडकाफडकी बदली झाली. व्ही. आय. पी सुरक्षा विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची जबाबदारी देत त्यांना साईड कॉर्नर केल्याचे दिसून येते. अंकुश शिंदे हे पिंपरी चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त असतील. आर. के. पद्मनाभन आणि संदीप बिष्णोई यांच्या प्रमाणे कृष्णप्रकाश यांची देखील कारकिर्द अल्प राहिली. 05 सप्टेंबर 2020 रोजी आयुक्तालयाचा पदभार स्विकारल्यानंतर 18 महिन्यांच्या कार्यकाळात कृष्णप्रकाश यांनी अनेक धडाकेबाज कारवाया केल्या तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महत्तवपूर्ण निर्णय घेतले. त्यांचा शहरातील कार्यकाळाचा घेतलेला धांडोळा…

पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन करून 15 ऑगस्ट 2018 रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. आयुक्तालायाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर असणारे उद्योग क्षेत्र आणि नव्याने उदयाला आलेले आयटी क्षेत्र यामुळे या भागातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय आहे. चार वर्षांत चार आयुक्त लाभलेल्या पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे तिसरे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची कारकीर्द सर्वात चर्चेची राहिली. आयुक्तालयासाठी कमी असणारे मनुष्यबळ आणि साधन सामग्री हा नेहमीच चिंतेचा विषय होता. कृष्णप्रकाश यांनी त्यांच्या कार्यकाळात पहिली पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविली. तसेच, शहरात गस्त घालण्यासाठी व पोलिसांचा प्रतिसाद वेग वाढविण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीने चारचाकी व दुचाकी वाहने मिळवली.

शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कृष्णप्रकाश यांनी पोलीस दलात अनेक पथके सुरू केली. गुन्हेगारी विश्वात अडकलेल्या अल्पवयीन मुलांसाठी समुपदेशन केंद्र सुरू केले. तसेच, त्यांना गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी सामाजिक संस्थांना सोबत घेऊन त्यांना विविध खेळाचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले. त्याच्या या प्रयत्नाचे सर्व स्तरातून कौतुक झाले. कृष्णप्रकाश यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता धडाकेबाज कारवाया केल्यात. यामध्ये पिंपरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे याला देखील अटक करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. यावेळी कारवाईस विलंब लागत असल्याने त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याची चर्चा देखील झाली होती.

वेशांतर करून ह्द्दीतील पोलीस ठाण्यांना भेट देऊन सामान्य नागरिकांना पोलीस कशी वागणूक देतात याची लिटमस टेस्ट देखील कृष्णप्रकाश यांनी केली होती. तसेच, वेशांतर करून विविध कारवाईमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले होते. कोये, चाकण येथे खुनाच्या गुन्हातील तीन आरोपींना पकडताना आरोपी आणि पोलिसांमध्ये क्रॉस फायरिंग झाले. गुन्हेगारांचा पाठलाग करताना कृष्णप्रकाश यांनी तेथे पडलेले झाड उचलून आरोपींच्या अंगावर फेकले त्यामुळे आरोपी खाली पडले व पथकातील पोलिसांनी आरोपींना अटक केली. या कारवाईत कृष्णप्रकाश जखमी झाले होते. दरम्यान, या फिल्मीस्टाईल कारवाई बाबत देखील लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

शहरातील अवैध धंद्यांना चाप बलविण्यासाठी कृष्णप्रकाश यांनी केलेले प्रयत्न वाखण्याजोगे आहेत. त्यांनी शहरात अवैध धंदे बोकाळू दिले नाहीत. पण, माथाडी क्षेत्रातील वर्चस्ववाद मोडीस काढता आला नाही हे वास्तव आहे. स्ट्रिट क्राईमला आळा घालण्यात त्यांना म्हणावे असे यश मिळाले नाही. शहरातील ट्रॉफिक समस्या जैसे थे आहे. याशिवाय शहरातील बहुचर्चित सेवा विकास बँक व आनंद सहकारी बँक घोटाळा प्रकरण त्यांना तडीस नेता आले नाही.

कोरोना काळात पोलीस कर्मचा-यांना पाठबळ

कोरोना संसर्गाची दुसरी शहरात तीव्र होती. या लाटेत अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची बाधा झाली होती. काहींची प्रकृती गंभीर होती. या कठीण काळात पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश पोलीस कर्मचा-यांच्या पाठीशी कुटुंबप्रमुखाप्रमाणे ठामपणे उभे राहिले त्यांना धीर दिला. पोलिसांना उपचारासाठी डि. वाय. पाटील रूग्णालयात स्वतंत्र वार्ड उपलब्ध करून दिला. या शहरातील कायदा सुव्यवस्था आबाधित ठेण्याचे काम त्यांनी केले.

खेळप्रेमी पोलीस आयुक्त

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना खेळामध्ये विशेष ऋची आहे. ते स्वत: एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धावपट्टू आहेत. हॉकी या खेळावर त्यांचे विशेष प्रेम असून, ते महाराष्ट्र हॉकी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पुढाकारातून आणि महापालिकेच्या सहकार्यातून शहरात प्रथमच राष्ट्रीय हॉकी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.