Fight against Corona Short Film : महिला आरोग्य कार्यकर्त्यांच्या शॉर्ट फिल्मची सर्व स्तरातून प्रशंसा

Short Film : Short film of women health workers appreciated from all levels

एमपीसी न्यूज – करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. जरी यातून बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय असले तरी लागण होण्याचे प्रमाण वाढते आहे. लोक सुमारे दोन महिने आपापल्या घरात लॉकडाऊन होते. पण करोना योद्धे मात्र जीवाची पर्वा न करता याला तोंड देत आहेत.

‘मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता’ आणि ‘ऑक्झिलरी नर्स मिडवाइव्स’ या संस्थांसाठी काम करणाऱ्या महिला कार्यकर्ता स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोकांची मदत करत आहेत. या महिलांचे कर्तृत्व दाखवण्यासाठी एका लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा लघुपट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

जणूकाही या शॉर्टफिल्मद्वारे सरकारने या महिला कार्यकर्त्यांना मानवंदनाच दिली आहे. पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाद्वारे या शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. my gov या फेसबुक पेजवर ही फिल्म प्रदर्शित करण्यात आली आहे. ‘कोविड के खिलाफ सबसे आगे महिलाये’ असं या फिल्मला नाव देण्यात आलं आहे. लक्षवेधी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत ४० लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.

या फिल्ममध्ये महिला कार्यकर्त्यांची स्तुती करण्यात आली आहे. लहान मुलांना पोलियो लस देण्यापासून गर्भवती महिलांच्या मदतीपर्यंत अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या या महिलांनी पार पाडल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे तोंडावर लावलेल्या मास्क व्यतिरिक्त यांच्याकडे कुठलेही सुरक्षा कवच नाही. परंतु तरीही विचलित न होता या महिला आपलं काम करत आहेत.

पॉप्युलेशन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक पूनम मुत्तरेजा यांनी या महिलांना खऱ्या योद्धा असं म्हटलं आहे. “ज्या प्रमाणे युद्धावर गेलेले सैनिक जीवाची पर्वा न करता देशवासीयांचे संरक्षण करतात अगदी त्याच प्रकारचे काम या महिला कार्यकर्ता करत आहेत. करोनाबाबत जनजागृती करण्यात या महिलांनी सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे या शॉर्टफिल्मच्या माध्यमातून आम्ही त्यांचे कौतुक केले आहे.” असं म्हणत त्यांनी या महिला कार्यकर्त्यांची स्तुती केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.