Chinchwad News: अल्पाक्षरीत्व हे उत्तम कवितेचे वैशिष्ट्य – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज – “अल्पाक्षरीत्व हे उत्तम कवितेचे वैशिष्ट्य असते,” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् , चिंचवडगाव येथे कवयित्री समृद्धी सुर्वे लिखित ‘जाणिवांची आवर्तने’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना प्रभुणे बोलत होते. ज्येष्ठ समीक्षक अरविंद दोडे, संजय कदम, प्रतिमा कदम, शोभा जोशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी जयश्री श्रीखंडे (‘काहूर’), मीना शिंदे (‘मागणी’), सुप्रिया लिमये (‘अंतरे’) आणि सविता इंगळे (‘ध्यानस्थ’) यांनी समृद्धी सुर्वे यांच्या नूतन काव्यसंग्रहातील कवितांचे अभिवाचन केले.

 

गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, “समृद्धी सुर्वे यांच्या कविता संवादात्मक आहेत. भावकाव्य अन् मुक्तच्छंदाचा त्यांत समन्वय आहे. जमिनीतून अंकुर फुटावा इतकी सहजता त्यांच्या काव्याभिव्यक्तीत आहे. जीवनाची आसक्ती ‘जाणिवांची आवर्तने’मधून प्रतीत होते!”

अरविंद दोडे यांनी “‘जाणिवांची आवर्तने’ या कवितासंग्रहातील कविता म्हणजे ज्ञानाची आवर्तने आहेत!” असे मत व्यक्त केले. तर, संजय कदम यांनी, “आम्ही सैन्यदलात कर्तव्यावर असताना आमच्यासोबत कुटुंबीय नसतात; परंतु साहित्यिकांच्या पुस्तकांचा सहवास असतो!” अशा भावना व्यक्त केल्या. प्रकाशक नितीन हिरवे, पंजाबराव मोंढे, शोभा जोशी यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केलीत. कवयित्री समृद्धी सुर्वे यांनी आपल्या कृतज्ञतापर मनोगतातून, “कुटुंबीयांच्या प्रोत्साहनातून काव्यलेखनाचा प्रारंभ झाला. कवितांच्या सान्निध्यात ज्या नवनव्या गोष्टींची जाणीव होत गेली, त्यांची आवर्तने या काव्यसंग्रहात शब्दांकित झाली आहेत!” अशा शब्दांतून आपल्या काव्यलेखनाची वाटचाल मांडली.

संजय सुर्वे, नंदकुमार मुरडे, रीदिमा सुर्वे, नीलेश शेंबेकर, हृतिका कदम, कैलास भैरट, रघुनाथ पाटील यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास घुमरे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.