Pimpri: मुख्यमंत्र्यांनी प्रश्न मांडण्याची संधी द्यायला हवी होती-गौतम चाबुकस्वार

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मला पिंपरी मतदार संघातील प्रलंबित प्रश्न मांडायचे होते. मी मागासावर्गीय लोकांचे प्रतिनिधित्व करत आहे. झोपडपट्टीत राहणा-या नागरिकांचे प्रश्न मला मांडायचे होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केवळ दोन मिनिटे बोलण्यास वेळ देऊन मला प्रश्न मांडण्याची संधी द्यायला हवी होती अशी, अपेक्षा शिवसेना आमदार ऍंड . गौतम चाबुकस्वार यांनी केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि.9)झाले. या कार्यक्रमात भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी प्रलंबित पश्न मांडले. त्यावेळी शिवसेना आमदार चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्र्यांना मला दोन मिनिटे द्या, अशी विनंती केली. परंतु, त्यांना बोलू दिले नाही. त्यावर आमदार चाबुकस्वार यांनी आज (गुरुवारी) पत्रकारांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.

आमदार चाबूकस्वार म्हणाले, प्राधिकरणाच्या साडेबारा टक्के परताव्याचा, एमआयडीसीतील प्रलंबित प्रश्न, शहरासाठी स्वतंत्र कारागृह, न्यायालयाबाबतचे प्रश्न मला मांडायचे होते. त्यासाठी मी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहे. या खात्यांचे राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासमोर बैठका झाल्या आहेत. परंतु, ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असून त्यांच्या टेबलावर फाईल आहे. त्यामुळे हे प्रश्न मला त्यांच्यासमोर मांडायचे होते. त्यांच्यासमोर प्रश्न मांडल्यानंतर ते सुटण्यास मदत झाली असती. परंतु, मला बोलून दिले नाही. मी मागासवर्गीय लोकांचे प्रतिनिधीत्व करत आहे. त्यामुळे मागासवर्गीय आमदाराविषयी मनात वेगळी भावना ठेवणी चुकीची आहे.

पोलीस आयुक्तालयाचे श्रेय शिवसेनेचे आहे. त्याबाबत सातत्याने मी पाठपुरावा करत विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. शिवसेनेच्या पाठपुराव्यानेच आयुक्तालयाचा प्रश्व मार्गी लागला आहे. परंतु, त्यानंतर काही लोकांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले.

खासदार बारणे म्हणाले, आमदार गौतम चाबुकस्वार राखीव मतदार संघातून निवडून आले असून मागासवर्गीय लोकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांना बोलून न देता मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या प्रकारची वागणूक देणे चुकीचे आहे. सत्ताधारी मागासवर्गीय आमदाराविषयी मनात वेगळी भावना ठेवून काम करतात. शिवसेना त्याचा निषेध करत आहे. त्याचबरोबर विनाकाराण मारुती भापकर यांना देखील पोलिसांनी दिवसभर स्थानबद्ध केले होते. त्याचा देखील आम्ही निषेध करत आहोत. असे स्थानबद्ध करुन भाजप आपले पितळ उघडे पडू नये, याची दक्षता घेत आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.