Nigdi : श्रद्धा शिंदे यांच्या कथ्थक आणि पवित्र कृष्णा भट यांच्या भरतनाट्यमच्या नृत्यउन्मेष या प्रस्तुतीने रसिक भारावले

एमपीसी न्यूज – स्वरसागर महोत्सवाच्या दुस-या दिवशी शुक्रवारी (२४ जानेवारी) रोजी नृत्यउन्मेष या अत्यंत मनोहारी अशा नृ्त्याच्या कार्यक्रमाने सुरुवात झाली. त्यात श्रद्धा शिंदे यांनी कथ्थक आणि पवित्र कृष्णा भट यांनी भरतनाट्यममधील पदलालित्याने सजलेल्या अप्रतिम नृत्यरचना सादर करुन रसिकांना मोहवून टाकले. 

_MPC_DIR_MPU_II
मदनलाल धिंग्रा मैदानावर सुरु असलेल्या २१ व्या स्वरसागर महोत्सवाच्या दुस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्याच्या युवा कलाकारांनी केलेल्या सादरीकरणात रसिक भान हरवून बसले. स्वरसागर महोत्सवाचे मुख्य प्रायोजक फरांदे स्पेसेस हे आहेत. कलाकारांचा सत्कार उपमहापौर तुषार हिंगे, माजी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे यांच्या हस्ते करण्यात आला.श्रद्धा आणि पवित्र यांनी आपल्या नृत्याची सुरुवात अर्धनारी नटेश्वर या एका अप्रतिम रचनेने केली. या नृत्यातील त्यांच्या कथ्थक आणि भरतनाट्यममधे गुंफलेल्या संरचनाच्या लक्षवेधी सादरीकरणाने रंगमंचावर जणू काही बिजलीच अवतरल्याचा भास झाला.  त्यानंतर श्रद्धा यांनी स्वतंत्र सादरीकरण करताना तीनतालातील रचना सादर केली. कृष्णाला भेटणा-या गोपी श्रद्धा यांनी या उठाणातून अत्यंत मोहक पदन्यासाने प्रत्यक्ष रंगमंचावर जिवंत केल्या. नंतर थाट, आमद, परण, परमेलू, चक्रधार आणि तिहाईने आपल्या पहिल्या सत्रातील नृत्याची सांगता केली.

त्यानंतर पवित्र कृष्णा भट यांनी भरतनाट्यम सादर करताना वर्णमने नृत्याची सुरुवात केली. त्रिवेंद्रमच्या महाराजांनी रचलल्या या नृत्यरचनेत कृष्णाचे वर्णन मेघ, भुंगा, पाने, फुले, मासे यांच्याशी केले होते.  राग मोहनम आणि  आदी तालातील ही रचना बन्सीवाले ने मन मोहा ही नृत्यरचना पवित्र यांनी अत्यंत रेखीवपणे सादर केली. त्यांचे विभ्रम, अत्यंत लवचिक असे शरीर प्रत्येक भाव बोलके करत होते. रंगमंचावर खट्याळ, खोडकर कान्हा त्यांनी आपल्या मोहक अदांनी प्रत्यक्ष उभा करुन रसिकांना जणूकाही गोकुळातच गेल्याचा भास निर्माण केला. तराना आणि तिल्लाना यांचे एकत्रित सादरीकरण करुन श्रद्धा आणि पवित्र यांनी आपल्या नृत्यप्रस्तुतीचा समारोप केला.  यावेळी त्यांनी आपल्या नृत्यात उपस्थितांना देखील सहभागी करुन घेतले. त्यामुळे प्रत्येकाला जणूकाही आपणच नृत्य करीत असल्याचा भास झाला असे म्हटले तर वावगे होणार नाही.

या कथ्थकनृत्यासाठी तबला साथ  विवेक मिश्रा यांनी, गायनसाथ सोमनाथ मिश्रा यांनी व सतारीची साथ अलका गुजर यांनी केली. भरतनाट्यम नृत्यासाठी गायन साथ ऐश्वर्या नायर यांनी, मृदंग साथ आर. शक्तिधरन यांनी आणि बासरी साथ भरतराज यांनी केली.

शेवटच्या दिवशी म्हणजे २५ जानेवारीला(शनिवार) रसिकांचा लाडका गायक महेश काळे यांचे गायन होणार आहे. तसेच लोकशाहीर रामानंद उगले यांचा महाराष्ट्राचा लोकरंग हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.