Pimpri: हर्डीकर प्रशासन निष्क्रिय; विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचेही टीकास्त्र

shravan Hardikar administration inactive; opposition and ruling party slams on pcmc administration

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे प्रशासनावर नियंत्रण नाही. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. पावसाळापूर्व कामे झाली नाहीत. सगळीकडे खोदाई केली आहे. नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे आयुक्तांना बदलीचे वेध लागले आहेत. आयुक्तांनी आत्मपरिक्षण करावे, असा हल्लाबोल विरोधकांनी केला.

तर, प्रशासनात कसलाही ताळमेळ नाही. अधिकारी फोन उचलत नाहीत. आम्हाला सत्तेत येवून आणि आयुक्तांना पालिकेत येवून तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. सत्ताधारी म्हणून आम्ही कमी पडलो की आयुक्त कमी पडले असा सवाल सत्ताधारी नगरसेवकांनी उपस्थित केला.

चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर गुरुवारी झालेल्या महासभेत सुमारे चार तास चर्चा झाली. प्रशासन सज्ज नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी टीकास्त्र सोडले.

कोरोनात चांगले काम केल्याने दोन दिवसांपूर्वी प्रशासनाचे कौतुक करणाऱ्या नगरसेवकांनी चांगलेच तोंडसूख घेतले.

कोण काय म्हणाले!

भाजपच्या सुजाता पालांडे म्हणाल्या, निसर्ग वादळ येणार असूनही प्रशासनाची कोणतीही तयारी नव्हती. प्रशासन झोपले होते का, शहरात रस्त्यावर सर्वत्र झाले पडली. घरांवर देखील मोठ मोठी झाडे पडली. पण, प्रशासन रस्त्यावर उतरले नाही. नगरसेवकांनी स्वत: मनुष्यबळ उपलब्ध करुन झाडे हटविली आहेत.

महापालिकेचा उद्यान अधीक्षक कोण आहे हेच नगरसेवकांना माहिती नाही. वेळीच झाडे हटविली नाहीत असे सांगत राष्ट्रवादीच्या मंगला कदम म्हणाल्या, पाच दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही.

तर, कोरोना होण्यापासून वाचण्यासाठी वारंवार हात कसे धुतले जाणार आहेत. धरणात पाणीसाठा ठेऊन आयुक्तांना गोल्ड मेडल मिळणार आहे का? आयुक्तांनी आत्मपरिक्षण करावे. झाडे, पाणी प्रशासनाचे शून्य नियोजन आहे. प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या वैशाली घोडेकर म्हणाल्या, सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक राहिला नाही. महापालिकेत भोंगळ कारभार सुरु आहे. धरणात पाणी असूनही नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. तीन-तीन दिवस पाणी येत नाही.

भाजपचे संदीप वाघेरे म्हणाले, आम्हाला सत्तेत येवून आणि आयुक्तांना पालिकेत येवून तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. सत्ताधारी म्हणून आम्ही कमी पडलो की आयुक्त कमी पडले हेच कळत नाही.

भाजपचेच विकास डोळस म्हणाले, आपत्कालीन व्यवस्था कुचकामी आहे. उपअभियंत्याना तांत्रिक ज्ञान नाही. अधिकारी काम करत नाहीत. नाकर्त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी प्रशासनावर जोरदार टीकास्त्र सोडले. पालिकेची आपत्कालीन व्यवस्था कुचकामी ठरली आहे. आयुक्तांना तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे बदलीचे वेध लागले आहेत.

त्यांचे प्रशासनावर कसलेही नियंत्रण राहिले नाही. शहरात स्मार्ट सिटीच्या नालाखाली केलेल्या खोदाईमुळे सगळीकडे खड्डे पडले आहेत. त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही.

माजी सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, महापालिका प्रशासन चांगले काम करत आहे. विरोधक केवळ आरोप करत आहेत. महावितरण राज्य सरकारकडे आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी महापालिकेची नाही.

राष्ट्रवादीचे माजी महापौर योगेश बहल म्हणाले, शहराचे दुर्देव आहे. भाजपचे ठराविक लोकच कारभार करत आहेत. उपमहापौरांनाच धन्वंतरी योजना काय आहे हे माहिती नाही.

सभाशास्त्राप्रमाणे सभाकामकाज केले जात नाही. विरोधकांना बोलू दिले जात नाही. भाजपच्या तीन वर्षाच्या राजवटीत एकदाही अर्थसंकल्पावर चर्चा झाली नाही.

जनता हे पाहत आहे. यापुढेही असेच सभागृह चालणार असेल. तर, एकही विरोधी नगरसेवक सभागृहात बसणार नाही.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, राज्यातील सत्ता बदलानंतर आयुक्त आता कुठे आमचे ऐकत आहेत. आयुक्तांनी पक्षविरहित राहून कामकाज करणे आवश्यक आहे.

कोरोनामुळे नागरिक गावाला गेले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासली नाही. पण, भविष्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, विरोधक आमच्यावर चुकीचे आरोप करत आहेत. जाणून-बुजून फोन बंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. कामचुकार अधिकाऱ्यांवर आयुक्तांनी कठोर कारवाई करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.