Pune News : श्रावणीला मिळाला आमदार शिरोळे यांच्याकडून ‘रोबोटिक हात’

एमपीसी न्यूज – काही महिन्यांपूर्वी श्रावणी वाळुंज या 14 वर्षांच्या मुलीने अपघातात डावा हात गमावला होता. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुढाकार घेऊन तिला ‘रोबोटिक हात’ मिळवून दिला.

आता तिच्या हातामध्ये जाणीवा निर्माण झाल्या असून, त्या हाताने तिला कामे करता येऊ लागल्याने श्रावणीला आनंद झाला आहे.

एका अपघातात श्रावणीने हात गमावला होता. हातासाठी कराव्या लागणाऱ्या उपचारांचा खर्च तिच्या कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेर होता. त्यामुळे तिला मदतीची गरज होती. आमदार शिरोळे यांनी ही परिस्थिती लक्षात घेतली आणि फिटवेल गॅसकेट को. प्रायव्हेट लिमिटेडचे चैतन्य शिरोळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्याने श्रावणीला रोबोटिक हात मिळवून दिला.

रोबोटिक हात बसविल्यानंतर ती स्वतःची कामे करू लागली आहे, असे आमदार शिरोळे यांना सांगितले.

आपण समाजाचे देणे लागतो, ज्यांना गरज असते त्यांना योग्यवेळी मदत देणे हीच खरी माणुसकी. ज्यांना आपण मदत करतो, त्यावेळी त्यांनी दिलेले आशीर्वाद आपल्याला पुढील कार्यासाठी प्रेरणा देत रहातात, अशी भावना आमदार शिरोळे यांनी व्यक्त केली. सहकार्य केल्याबद्दल चैतन्य शिरोळे यांचेही त्यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.