Dehugaon: श्री संत तुकाराम महाराज मंदिर 23 मार्चपर्यंत भाविकांसाठी बंद

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहूगावातील श्री संत तुकाराम महाराजांचे मंदिर आजपासून 23 मार्चपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता खबरदारी म्हणून प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साथ देत मंदिर बंद ठेवले असल्याचे संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य सरकारने विविध पावले उचलली आहेत. जगभरात थैमान घालणारा जीवघेणा करोना विषाणू महाराष्ट्रातही आपले जाळे पसरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. मुख्यंमंत्र्यांनी सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी मात्र थांबविण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर आता राज्यभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले देहूगावातील श्री संत तुकाराम महाराजांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंदिरात महापूजा, काकड आरती या नित्य पूजा होणार आहेत. गर्दी करु नका असे आदेश शासकीय पातळीवर देवूनही भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर तसेच परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर 23 मार्चला मंदिर सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी मंदिर परिसरात न येता संस्थानला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

आठवडे बाजार बंद

देहूगावचा मंगळवार आणि शुक्रवार आठवडे बाजार असतो. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुडकर यांनी आजचा मंगळवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.