Kasarsai : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 18 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात

सर्वपक्षीय पॅनल पद्धतीच्या विरोधात मदन बाफना

एमपीसी न्यूज- श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी 211 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 179 उमेदवारांनी माघार घेतल्याने 21 पैकी सोमाटणे पवनानगर गटातील तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे हा संपूर्ण गट बिनविरोध झाला आहे. उर्वरित 18 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, मदन बाफना यांनी बिनविरोध निवडणुकीला आपला विरोध असल्याची भूमिका मांडली आहे. साखर कारखाना निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी छाननीनंतर 211 अर्ज शिल्लक राहिले होते. मंगळवार दि. 4 फेब्रुवारी रोजी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. 211 पैकी 179 उमेदवारांनी माघार घेतल्याने 21 पैकी तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित 18 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

सोमाटणे- पवनानगर गटातील तीनही जागा बिनविरोध झाल्या. (गट क्रमांक 4 मध्ये नरेंद्र ठाकर, सुभाष राक्षे, शामराव राक्षे सर्वपक्षीय पॅनल) हा गट पूर्ण बिनविरोध झाला आहे. 21 उमेदवार हे सर्वपक्षीय पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. अर्थात ही निवडणूक सर्वपक्षीय पॅनल विरुद्ध इतर उमेदवार अशी होणार आहे.

ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा तथा नाना नवले व सर्वच संचालकांची इच्छा होती. त्यासाठी सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी विशेष प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. आता 18 जणांना निवडणुकीचा सामना करावा लागत आहे.

निवडणुकीच्या रिंगणातील गटनिहाय उमेदवार

हिंजवडी- ताथवडे गट क्र 1 (तीन जागा)
विदुरा नवले, बाळासाहेब बावकर, तुकाराम विनोदे (सर्वपक्षीय पॅनेल)
पांडुरंग राक्षे अपक्ष

पौड- पिरंगुट गट क्र. 2 (तीन जागा)
दिलीप दगडे, महादेव दुडे, अंकुश उभे सर्वपक्षीय पॅनेल.
संग्राम मोहोळ अपक्ष

तळेगाव- वडगाव गट क्र. 3 (तीन जागा)
बापूसाहेब भेगडे, माऊली दाभाडे, शिवाजी पवार सर्वपक्षीय पॅनल.
बाळासाहेब नेवाळे, तुकाराम नाणेकर, पंढरीनाथ ढोरे अपक्ष

सोमाटणे- पवनानगर गट क्र 4 (तीन जागा) नरेंद्र ठाकर, सुभाष राक्षे, श्यामराव राक्षे सर्वपक्षीय पॅनेल- तिघेही बिनविरोध

_MPC_DIR_MPU_II

खेड, शिरूर, हवेली गट क्र 5 (चार जागा)
प्रवीण काळजे, मधुकर भोंडवे, दिनेश मोहिते, अनिल लोखंडे सर्वपक्षीय पॅनेल.
अरूण लिंभोरे अपक्ष.

महिला राखीव (दोन जागा)
शुभांगी गायकवाड, ताराबाई सोनवणे सर्वपक्षीय पॅनेल.
रूपाली दाभाडे अपक्ष

नागरिकांचा मागास प्रवर्ग (एक जागा)
चेतन भुजबळ सर्वपक्षीय पॅनेल
अरूण लिंभोरे अपक्ष.

अनुसूचित जाती जमाती (एक जागा)
बाबासाहेब गायकवाड सर्वपक्षीय पॅनेल
सखाराम गायकवाड अपक्ष.

भटक्या विमुक्त जाती (एक जागा)
बाळासाहेब कोळेकर सर्वपक्षीय.
शिवाजी कोळेकर, सुरेश जाधव अपक्ष

सर्वपक्षीय पॅनल पद्धतीच्या विरोधात मदन बाफना

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेले सर्वपक्षीय पॅनेल हे बिनविरोधच्या नावाखाली मनमानी पध्दतीने करण्यात आलेले असून या सर्वपक्षीय पॅनलला माझा विरोध असल्याचे मदन बाफना यांनी सांगितले. बाफना म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध न करता महाआघाडीच्या माध्यमातून लढवावी परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा तथा नाना नवले यांनी निवडणूक टाळण्यासाठी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला. या निवडणुकीत भाजपाला बरोबर घेण्याची आवश्यकता नव्हती असेही बाफना म्हणाले.

आजच्या परिस्थितीत भाजपाला बरोबर घेऊन पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे आहे. मागच्या पंचवार्षिकमध्ये भाजपाचे सरकार सत्तेवर होते. त्यावेळी कारखान्याच्या निवडणुकीत भाजपाला झुकते माप दिले होते. यावेळी मात्र राज्यात महाआघाडीचे सरकार असल्याने ही निवडणूक महाआघाडीच्या माध्यमातून लढवावी ही माझी भूमिका होती असे बाफना यांनी सांगितले.

यावेळी सरकार आपले, आमदार, खासदार आपला मग निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एवढा आटापिटा का? बिनविरोध करण्याची गरज काय ? असा सवाल त्यांनी केला. बिनविरोध निवडणुकीत मावळमध्ये भाजपाला जागा जातात आणि आपल्या पक्षाच्या जागा कमी होतात. त्यामुळे सुरूवातीला बिनविरोध निवडणुकीला विरोध केला होता. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत सुद्धा विचारात न घेता मनमानी व हुकूमशाही पद्धतीने निवड केल्याने, ती पद्धती पक्षाला कमीपणा आणणारी व पक्षाचे खच्चीकरण करणारी आहे. अशा प्रक्रियेला माझा ठाम विरोध राहील अशी भूमिका बाफना यांनी मांडली. कारखान्याच्या स्थापनेपासून केवळ शेतक-याचे हित व कारखान्याची प्रगती याची जाणीव ठेवून आम्ही बिनविरोधसाठी सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली असेही बाफना म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.