Pune: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust organizes the first online cultural festival from 22nd August to 1st September.

एमपीसी न्यूज – गणेशोत्सव म्हटलं की सर्वत्र उत्साह संचारलेला असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करत असताना उत्सवावर काही मर्यादा आल्या आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि मर्यादांवर मात करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने 129 व्या वर्षानिमित्त पुण्यासह जगभरातील गणेशभक्तांसाठी पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला पुनीत बालन यांच्यासह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर, लीड मीडियाचे विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

पुनीत बालन म्हणाले, श्री गणरायांचे आगमन हा आनंदाचा, उत्साहाचा, समाजात नवचैतन्य निर्माण करणारा उत्सव आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे समाजात सध्या काही प्रमाणात निराशेचे वातावरण निर्माण झालेले आहे, गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे, पुण्याने जगाला सार्वजनिक गणेशोत्सव दिला, त्या गणेशोत्सवाची ओळख विधायक कार्यासाठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, महापालिका प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ट्रस्टच्या वतीने विधायकतेला आधुनिकतेची जोड देत गणेशोत्सवानिमित्त पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे, या विधायक उपक्रमाची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल असा विश्वास वाटतो.

या सांस्कृतिक महोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2020 दरम्यान श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, पुणे च्या www.shrimantbhausahebrangariganpati.com  या अधिकृत संकेतस्थळावर होणार आहे.

हा सांस्कृतिक महोत्सव सर्व गणेशभक्तांना विनामूल्य अनुभवता येणार आहे, यामुळे गणेशभक्तांनी घरी सुरक्षित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन पुनीत बालन यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.