Chinchwad: श्रीमोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाची उत्साहात सांगता

समाधी दिनानिमित्त समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी

एमपीसी न्यूज – श्रीमन महासाधू श्रीमोरया गोसावी यांचा 457 वा संजीवन समाधी महोत्सव उत्साहात पार पडला. विविध धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांनी या महोत्सवाची सांगता करण्यात आली. मोरया गोसावी यांच्या समाधी दिनानिमित्त आज (गुरुवारी) श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

गुरुवारी पहाटे साडेचार वाजता चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते श्रीमोरया गोसावी समाधीची महापूजा व अभिषेक करण्यात आला. सकाळी सात वाजता श्रीमोरया गोसावी यांची दिंडी काढण्यात आली. ही दिंडी श्रीमोरया गोसावी समाधी मंदिर परिसरात काढण्यात आली. त्यानंतर समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यामध्ये देवस्थानचे सर्व विश्वस्त, स्थानिक महिला, पुरुष व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

श्रीमोरया गोसावी चरित्र पठण झाल्यानंतर ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप यांचे काल्याचे कीर्तन झाले. श्रीमोरया गोसावी हे महान गणेशभक्त होते. त्यांनी श्रीगणेशाची मनोभावे सेवा केली आहे. त्याप्रमाणे आपणही आपले जे श्रद्धास्थान आहे, त्याची मनोभावे प्रार्थना करायला हवी. या प्रार्थनेमध्ये कुठलाही स्वार्थ चिकटता कामा नये. निस्वार्थपणे आपल्या श्रद्धास्थानाची सेवा केल्यास जीवनाचे सार्थक होते, अशा प्रकारचा संदेश प्रमोद महाराजांनी आपल्या कीर्तनातून दिला.

काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवड व शहरातील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री श्रीमोरया गोसावी समाधी समोर धुपाआरती करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.