Bhosari : देशाला एकसंध ठेवण्यासाठी प्रत्येकाने बंधुभाव जोपासावा – डॉ. श्रीपाल सबनीस

एमपीसी न्यूज – “समाजामध्ये जाती-धर्माच्या नावाखाली फूट पडल्याचे चित्र आपल्या आजूबाजूला दिसते. परिणामी अनेक प्रकारच्या अस्थिरता निर्माण होतात. अस्थिरतेच्या चौकटी ओलांडून बंधुतेचा विचार कागदावर, भाषणापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येकाने ती जोपासली, तर समाजातील भरकटलेली व्यवस्था बंधुतेच्या धाग्याने बांधता येईल,” असे स्पष्ट प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व बाविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे उद्घाटक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांच्या संयुक्तपणे भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयातील भगवान महावीर सभागृहात आयोजिलेल्या बाविसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी चंद्रकांत वानखेडे, स्वागताध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, परिषदेचे संस्थापक बंधुताचार्य प्रकाश रोकडे, डॉ. विजय ताम्हाणे,कामगार नेते अरुण बोराडे, रोटरी क्लबचे प्रांतपाल पंकज शाह, औंध येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, निमंत्रक रामदास जैद व प्राचार्य सदाशिव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला. तसेच वानखेडे यांच्या ‘बंधुतेची भाषा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

दुपारच्या सत्रात राष्ट्रकवी विलास ठोसर (अकोट) यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे ‘काव्य पंढरी’ कविसंमेलन झाले. ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ, संगिता झिंजुरके यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कवी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी डॉ. नयनचंद्र सरस्वते ‘बयो कविते…’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. बबन धूमाळ यांना लोककवी वामनदादा कर्डक, पितांबर लोहार यांना लोकगायक प्रल्हाद शिंदे आणि दिनेश भोसले यांना पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “भगवान महावीर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद अशा युगपुरुषांनी समाजात सत्याच्या विचारांचे प्रयोग करून समाजाला योग्य दिशा दिली. साहित्यिकांमध्ये बंधुतेचा विचार घडवण्याची ताकद असते. जगाचा नकाशा जर बंधुतेचा निर्माण करायचा असेल तर समाजात बंधुतेची जाण असणारे साहित्यिक असणे गरजेचे आहे. संमेलनाच्या माध्यमातून हा बंधुतेचा यज्ञ तेवत आहे, ही समाजाच्या जडणघडणेसाठी महत्त्वाचे आहे. कोरोना काळात आपल्यातील बंधुता, मानवतेचे दर्शन घडले आहे.”

बंधुताचार्य प्रकाश रोकडे म्हणाले, “समाजामध्ये वावरत असताना माणूस होणे गरजेचे आहे. कोणत्याही जातीचे लेबल न लावता बहुभाषीय, बहुधर्मीय होत आम्ही सारे भारतीय आहोत, हा विचार आपल्या मनात रुजला पाहिजे. पुस्तके वाचायला लावणारी संमेलने होतात. मात्र माणूस वाचायला लावणारे हे संमेलन आहे. ‘गर्व से कहो हम बंधू है’ हे ब्रीदवाक्य घेऊन आम्ही कार्यरत आहोत.”

डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले, “गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बंधुता परिषद संमेलनाच्या माध्यमातून बंधुतेचा प्रचार आणि प्रसार करत आहे. समाजातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायाची भूमिका जपण्याचे कार्य बंधुता परिषद करत आहे.”

चंद्रकांत वानखेडे म्हणाले, “शेतकरी आणि माझ्यासारख्या छोटासा कार्यकर्ता या संमेलनाचा अध्यक्ष होतो, हा माझ्या आयुष्याचा आनंदी सोहळा आहे. बंधुतेचा विचार कायमच प्रमाणिकपणे जपत आलो आहे. लेखणीच्या माध्यमातून बंधुतेचा विचार समाजामध्ये मांडताना अगणिती आनंद होतो.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.