Shriramgatha : गायन, नृत्य, वादनातून साधला देवभाषा आणि मातृभाषेचा सुरेल सेतू

एमपीसी न्यूज : आधुनिक वाल्मिकी गदिमा यांनी रचलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतसाज देऊन अजरामर केलेले ‘गीतरामायण’ प्रत्येक मराठी माणसाच्या मनात वर्षानुवर्षे घर करून आहे. ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’, ‘ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा’, ‘आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे’, ‘सेतू बांधा रे सागरी’ ही आणि अशी रामायणातील अनेक गीते आपण आजही गुणगुणतो. पण हीच गीते युवा कलाकारांनी ‘श्रूयते श्रीरामेण स्वयंम्‌‍ कुशलव रामायण गीतम्‌‍’, ‘ज्येष्ठं ते हे नृपते देहिमे सुतम्‌‍’, ‘आकाशनाऽबद्धा नूनं धरणी जनीयू श्रृणुत स्वयंवराख्यानम्‌‍ सी स्वयंवराख्यानम्‌‍’ अशी संस्कृत भाषेत अप्रतिम आणि अस्खलितरित्या सादर केल्यानंतर देवभाषा आणि मातृभाषेचा सुरेल सेतू साधला गेला अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया रसिकांनी दिल्याची प्रचिती (Shriramgatha) आज आली.

निमित्त होते ते ‘श्रीरामगाथा’ अर्थात देवांच्या भाषेतून देवांची गाणी या कार्यक्रमाचे! संस्कृत दिनाचे औचित्य साधून शामराव कलमाडी हायस्कूल येथील शकुंतला शेट्टी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रसिकांच्या भरघोस प्रतिसादात गायन, नृत्य आणि वादन अशा युवा कलाकारांच्या आविष्कारातून हा कार्यक्रम रंगला. गदिमा यांचे ज्येष्ठ पुत्र आनंद माडगुळकर, प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज, ज्येष्ठ अभिनेते माधव वझे, उद्योजक गणेश साने, प्रवीण बढेकर, दिलीप काळोखे, साकेत घोडके, गायिका सानिया पाटणकर, गायक सौरभ साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना रोहित गुळवणी, कौशिक केळकर, अथर्व वैशंपायन, धवल आपटे आणि अश्विनी आपटे यांची तर संहिता लेखन अथर्व ढगे यांचे आहे. भूषण करंदीकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून गीत आणि कथासार यांची गुंफण केली. सी. भा. दातार यांनी मराठी गीतांचा संस्कृतमध्ये अनुवाद केला आहे.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गीतरामायणातील गीते गायकांनी मराठी आणि संस्कृतमधून सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ या गीताने झाली. ‘राम जन्मला ग सखे राम जन्मला (शुद्धपक्षे चैत्रमासे तत्र नवमंदिनम्‌‍ राम जनिरियम), ‘नकोस नौके परत फिरू’ (हे नौके मा गम: प्रतीपं मा गंगो मा धारय पूरम्‌‍), ‘माता न तू वैरिणी’ (माता न वैरिणी त्वम्‌‍), ‘मज आणून द्या तो हरिण’ (अनिय देहि मे नाथप्रियं तं त्वरितम्‌‍), ‘सेतू बांधा रे सागरी’ (सेतु रचयध्वं सागरे सेतु रचध्वयं सागरे), ‘भूवरी रावण वध झाला’ (रावणो यातो यमसदनम्‌‍) यासह विविध लोकप्रिये गीते सादर करण्यात आली. ‘गा बाळांनो श्रीरामायण’ (रामख्यानं गायतमेवंम) या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

सानिका वाघ, श्रीया शिंदे, रोहित गुळवणी यांनी सुरेल आवाजात गीते सादर केली तर माधव लिमये (हार्मोनियम), कौशिक केळकर, केदार टिकेकर (तबला आणि टाळ), अथर्व वैशंपायन (बासरी), क्षितिज भट (की-बोर्ड) यांनी साथसंगत केली. कथक नृत्यांगना सर्वेश्वरी साठे हिने काही रचनांवर (Shriramgatha) नृत्य सादर केले.

Shri Khsetra Beli : वडगांव घेनंद येथील पांडवकालीन मंदिरात शंकराच्या दर्शनासाठी गर्दी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.