Maval : श्रीरंग बारणे यांनी घेतली राज्यात तिस-या क्रमांकाची मते 

बारणे यांना 52.65 टक्के नागरिकांची मिळाली पसंती   

एमपीसी न्यूज – राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना राज्यात तिस-या क्रमाकांची मते मिळविण्याचा मान मिळाला आहे. बारणे यांनी झालेल्या मतदानापैंकी तब्बल 52.65 टक्के मिळविली आहेत. तर, पहिल्या क्रमाकांची मते कोल्हापूरचे शिवसेनेचे विजयी उमेदवार संजय मंडलिक तर ठाण्याचे शिवसेना उमेदवार राजन विचारे यांनी राज्यात दुस-या क्रमाकांची मते मिळविली आहेत. विशेष म्हणजे सगळीकडे भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले असताना महाराष्ट्रात मात्र शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या तीन क्रमांकाची मते मिळाली आहेत.  

मावळ लोकसभा मतदारसंघातून  21 उमेदवारांनी आपले नशिब आजमाविले. मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण 22 लाख 97 हजार 405 मतदार होते. त्यापैकी 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी 2 हजार 504 केंद्रावर  मतदानाचा हक्क बजाविला होता. एकूण 59 टक्के मतदान झाले होते. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना तब्बल  7 लाख 20 हजार 663 मतदान झाले. झालेल्या मतदानापैकी बारणे यांना 52.65 टक्के मतदारांनी पसंती दिली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पदरात 5 लाख 4 हजार 750 मते पडली. पवार कुटुंबाचा पहिल्यांदाच पराभव केल्याने श्रीरंग बारणे राज्यभरात चर्चेत आले आहेत. त्यातच राज्यातील 48 उमेदवारापैंकी तिस-या क्रमांकाची मते घेतल्याने बारणे पुन्हा चर्चेत आले आहेत.

कोल्हापूरचे शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांनी 7 लाख 49 हजार 85 मते घेऊन राज्यात सर्वाधिक मते घेण्याचा मान मिळविला आहे. तर, शिवसेनेचेच ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांनी 7 लाख 40 हजार 969 मते घेऊन दुस-या क्रमांकाची मते घेतली आहेत. तर, मावळचे शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 7 लाख 20 हजार 663 मते घेत राज्यात तिस-या क्रमाकांची मते घेण्याचा बहुमान मिळविला आहे.

जळगावचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांनी चौथ्या क्रमांकाची 7 लाख 13 हजार 874 मते घेत घेतली आहेत. पाचवा क्रमांक मुंबईचे भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांचा लागतो. त्यांना 7 लाख 6678 मते मिळाली आहेत. अहमदनगरचे भाजपचे सुजय विखे यांनी सहाव्या क्रमांकाची 7 लाख 4660 मते घेतली आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जालन्यातून सातव्या क्रमाकांची 6 लाख 98 हजार 19 मते घेतली आहेत.

बारामतीतून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी 6 लाख 86 हजार 714 मते घेत आठवा क्रमांक मिळविला आहे. बीडमधून भाजपच्या प्रितम मुंडे यांना 6 लाख 78 हजार 175 मते मिळाली आहेत. त्यांचा नववा क्रमांक लागतो. लातूरचे भाजप उमेदवार सुधाकर श्रुंगारे यांनी दहाव्या क्रमाकांची म्हणजेच 6 लाख 61 हजार 495 मते मिळविली आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी 6 लाख 60 हजार 221 मते घेत राज्यात अकराव्या क्रमाकांची मते घेतली.

रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे यांनी 6 लाख 55 हजार 386 मते घेत बारावा क्रमांक मिळविला. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपचे सुनील मेंडे यांनी 6 लाख 50 हजार 243 मते घेत तेरावा तर भाजपच्या डॉ. हिना गावीत यांनी 6 लाख 39 हजार 136 मते घेत चौदावा क्रमांक मिळविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.