Maval/ Shirur : श्रीरंग बारणे-पार्थ पवार, शिवाजीराव आढळराव-डॉ. अमोल कोल्हे यांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद

दगदग संपली, धाकधूक वाढली; 23 मे पर्यंत धाकधूक

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यासह 23 उमेदवारांचे भवितव्य आज (सोमवारी)मतदानयंत्रात बंद झाले आहे. त्यामुळे उमेदवारांची दगदग संपली असून धाकधूक वाढली आहे. 23 मे पर्यंत धाकधूक राहणार आहे. आता सर्वांना निकालाची म्हणजेच 23 मे ची प्रतिक्षा लागली आहे. 

मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातून मतदानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच नागरिकांनी बाहेर पडून मतदान केले. नव मतदार, ज्येष्ठ मतदारांसह सेलिब्रेटी, उद्योजकांनी देखील मतदानाचा आपला हक्क बजाविला आहे. मावळ मतदारसंघात सरासरी 58.21 टक्के मतदान झाले आहे.

मावळमध्ये पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पार्थ पवार यांच्यासाठी पवार कुटुंबियांनी मावळात तळ ठोकला होता. पार्थ यांचे वडील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: प्रचाराची सुत्रे हाती घेतली होती. त्यांनी राज्यभर जास्त सभा न घेता, मावळातच ठाण मांडले होते. त्याचबरोबर बारामती, बीड, उस्मानाबादसह राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील पार्थ यांच्यासाठी प्रचार केला होता. घरातील उमेदवार असल्याने पवार कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शिवसेना-भाजप महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी पार्थ यांना कडवे आव्हान दिले. मावळवर शिवसेनेचा तिस-यांदा भगवा फडकाविण्यासाठी बारणे यांनी कोणतीही कसूर सोडली नाही. मतदारसंघ त्यांनी पिंजून काढत जोरदार प्रचार केला. दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. त्यामुळे मतदारांनी नेमका कौल कोणाला दिला आहे हे 23 मे रोजी समजाणार आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे शिवाजीराव आढळराव या आजी-माजी सैनिकांमध्ये कडवी झुंज झाली आहे. डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांना कडवे आव्हान दिले आहे. कोल्हे यांनी जोरदार प्रचार करत प्रलंबित प्रश्वांवरुन आढळराव यांना जाहीर सभांमधून जाब विचारला. तर, शिवाजीराव आढळराव चौकार मारण्याच्या तयारीनेच निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यांनी तितक्याच आक्रमकपणे प्रचार केला. डॉ. कोल्हे यांना जशाच तसे प्रत्युत्तर दिले. आता मतदारांनी आपले मत मतपेठीत बंद केले आहे. त्यामुळे मतदारांनी नेमका कोणाच्या बाजुने कौल दिला हे 23 मे ला कळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.