Talegaon : कल्पेश मराठे हल्ला प्रकरणी सुनील शेळके समर्थकांचा मूक मोर्चा

एमपीसी न्यूज – वराळे फाटा येथे झालेल्या कल्पेश मराठे हल्ला प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. कल्पेश मराठे याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुनील शेळके समर्थकांनी सोमाटणे फाटा ते तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यापर्यंत पायी मूक मोर्चा काढला. पोलिसांनी पुरवणी फिर्याद घेऊन कलमवाढ करण्याचे तसेच कल्पेशवर लावलेली खोटी कलमे काढण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना दिले.

मावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या सुनील शेळके यांचा कार्यकर्ता कल्पेश मराठे याला गुरुवारी (दि. 5) रात्री वराळे येथे काही तरुणांनी पाईप व लोखंडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात तो कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कल्पेशने याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप भेगडे, बेल्लू उर्फ अजय भेगडे, प्रतीक नारायण भेगडे, अविष्कार भेगडे, अनिकेत अंकल भेगडे व अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील शेळके यांनी जखमी कल्पेशची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर कल्पेश याच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुनील शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी सोमाटणे फाटा ते तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यापर्यंत पायी मूक मोर्चा काढला. मारहाण करणाऱ्यांमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश असल्याने या प्रकरणामुळे मावळचे राजकारण चांगलेच तापले आहे.

सुनील शेळके म्हणाले, “पोलिसांनी कल्पेशच्या विरोधात खोटी कलमवाढ केली आहे. कल्पेशची पुन्हा पुरवणी फिर्याद घेऊन गुन्ह्यात कलमवाढ करण्यात येणार आहे. खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा आरोपींवर दाखल करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी दाखवलेली एकी आणि शांतता याचे पोलिसांनी देखील कौतुक केले आहे. ही एकी आणि शांतता पुढील काळात देखील आपण ठेवायची आहे. पैसा, सत्ता आणि मस्ती जास्त दिवस टिकत नाही. आपण प्रामाणिकपणे वागायचं. कोणी कितीही वाईट वागलं तरी आपण लोकशाही मार्गाने अन्यायाशी लढू, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच कल्पेशला चांगल्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे म्हणाले, “डॉक्टरांचे मेडिकल सर्टिफिकेट आणि कल्पेशचा पुरवणी जबाब घेऊन त्यानुसार गुन्ह्यात कलमवाढ करण्यात येणार आहे. कल्पेशचा जबाब घेण्याचे काम सुरु आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.