Pune : प्रभाग क्रमांक 22 मधील पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा इशारा

एमपीसी न्यूज – निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे हडपसरमधील सर्वच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रभाग क्र. २२ मधील पाणीपुरवठा मागील दोन महिन्यांपासून विस्कळीत करण्याचे षड्यंत्र सत्ताधार्‍यांकडून सुरू झाले आहे. नागरिकांना ब्लॅकमेल करणार्‍या सत्ताधार्‍यांना प्रशासनातील अधिकारीही नोकरीच्या भितीने सहकार्य करत आहेत, हे दुर्दैव आहे. प्रशासनाने अशा भेकड राज्यकर्त्यांच्या भीक न घालता प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा या प्रभागातील नगरसेवकांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व स्थानिक नगरसेवक चेतन तुपे, नगरसेवक बंडू गायकवाड, नगरसेविका हेमलता मगर आणि पूजा कोद्रे, माजी उपमहापौर निलेश मगर याप्रसंगी उपस्थित होते. ते म्हणाले की प्रभागालगतच्या नदीला महापूर आलेला असताना आमचा प्रभाग क्र.२२, मगरपट्टा सिटी परिसरात मागील दोन महिन्यांपासून पाणीबाणी सुरू झाली आहे. सुरुवातीला तांत्रिक कारण वाटले होते. अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर तेही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगत आहेत. परंतू त्याचवेळी ही तक्रार भाजपच्या आमदारांकडे केल्यानंतर पाणीपुरवठा लगेच सुरळीत केला जातो. याचा अर्थ केवळ आपण कार्यक्षम असल्याचे भासविण्यासाठीच आमदारांच्या सांगण्यावरून प्रशासनातील अधिकारी प्रभागातील पाणीपुरवठा खंडीत करतात आणि त्यांनी सांगितल्यावर सुरू करतात.

आमदारांची ही विकृती जनतेच्याही लक्षात आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात आम्ही कधीही तयार आहोत. परंतू केवळ मतांच्या राजकारणासाठी नागरिकांना वेठीस धरणे हे खालच्या पातळीचे राजकारण आहे. प्रशासनाने अशा लोकप्रतिनिधींच्या धमक्यांना न घाबरता तातडीने आमच्या प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आम्हाला जोरदार आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा या चारही नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.