Lonavala : सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – कुसगाव बु. येथिल सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. २४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापन झाली. हे वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षास जल अर्पण करून व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करून एनएसएस गीताद्वारे करण्यात आली. तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी आजचा युवक त्याची दशा व दिशा तसेच सिंहगडच्या फार्मसी कॉलेजच्या स्वयंसेवकांनी औषधे घेताना घ्यावयाची काळजी या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. त्यामधून आजच्या महाविद्यालयीन तरुणांना त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक गोष्टींची जाणीव करून दिली. संपर्क संस्थेचे जनसंपर्क अधिकारी प्रदीप वाडेकर प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना प्रदीप वाडेकर म्हणाले, आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असताना दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होते.

सिंहगड संकुलाचे संचालक व प्राचार्य डॉ. माणिक गायकवाड यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाबद्दल शाबासकी दिली. तसेच या दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना मध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्राचार्य, कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक यांचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी  संकुलातील महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. एम.एस.रोहोकले, डॉ. जयवंत देसाई, डॉ. शिवाजी देसाई, प्राचार्य डॉ. मोरेश्वर महाजन, पंकज जाधव, विजय वसेकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच फार्मसी कॉलेज व कॉमर्स कॉलेजमधील स्वयंसेवकांनी सहभाग  नोंदविला. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी सर्व विभाग प्रमुख शिक्षक व व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी  सुमित देवर्षी, संतोष दबडे, विशाल माळी  व स्वयंसेवक यांनी विशेष प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.