New Show ‘Singing Star’: सोनी मराठीवर रंगणार ‘सिंगिंग स्टार’

येत्या 21 ऑगस्ट पासून 'सिंगिंग स्टार' हा सोनी मराठी वाहिनीवर गाण्यांचा पहिला स्पर्धात्मक कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य स्वरुपात सादर होणार आहे.

एमपीसी न्यूज – चार महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता छोट्या पडद्यावरील मालिका जोर धरु लागल्या आहेत. अनेक नियमांचे पालन करत मालिकांचे शूटींग सुरु झाले आहे. तरीदेखील त्यात अजून तो पूर्वीचा उत्साह कमीच दिसत आहे. कारण पहिल्यासारखा मोकळेपणा अजूनही शूटींगच्या वेळी नसतो. तरीदेखील पूर्णपणे ठप्प असण्यापेक्षा हे केव्हाही चांगलेच आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर आजही नवीन काय द्यायचे याची चढाओढ आहे.

गायक अभिनेते, अभिनेत्री ही नवीन कल्पना घेऊन सोनी मराठी येत आहे. येत्या 21 ऑगस्ट पासून ‘सिंगिंग स्टार’ हा सोनी मराठी वाहिनीवर गाण्यांचा पहिला स्पर्धात्मक कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य स्वरुपात सादर होणार आहे.

संगीतातले दिग्गज संगीतकार सलील कुलकर्णी, गायिका बेला शेंडे आणि अभिनेता, गायक प्रशांत दामले हे या स्पर्धेचे परीक्षक आहेत आणि छोट्या पडद्यावरचा ग्लॅमरस चेहरा म्हणजेच ‘फुलपाखरु’ फेम ऋता दुर्गुळे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.

‘सिंगिंग स्टार’ या कार्यक्रमात अभिनेता, अभिनेत्री आणि गायक, गायिका अशा जोड्या स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत. म्हणजे अभिनेता किंवा अभिनेत्रीचा गाण्यासाठी एक मेन्टॉर आहे. तो गायक किंवा गायिका त्या अभिनेता किंवा अभिनेत्रीला गाण्यासाठी मदत करणार अशी याची संकल्पना आहे.

यात अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले, स्वानंदी टिकेकर, अर्चना निपाणकर, आरती वडगबाळकर, जुई गडकरी, पूर्णिमा डे व अभिनेता अंशुमन विचारे, संकर्षण कऱ्हाडे, यशोमान आपटे, आस्ताद काळे, अजय पुरकर आणि अभिजित केळकर सहभागी होणार आहेत. तारेतारकांमध्ये रंगणारे हे सांगितिक युद्ध नक्कीच मनोरंजक होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.