Sinhagad : अग्निशमनदलाच्या जवानांनी वाचवले आत्महत्या करणाऱ्या इसमाचे प्राण

एमपीसी न्यूज –  राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला अग्निशमनदलाच्या जवांनानी मोठ्या शिताफीने वाचवले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.30) रात्री एकरा वाजता सिंहगड (Sinhagad) रोडवरील वडगाव बुद्रुक येथील श्रद्धा अपार्टमेंटमध्ये घडला आहे.

मनोज चव्हाण (वय 38 रा. वडगाव बुद्रुक, पुणे) असे आत्महत्या करु पाहणाऱ्या इसमाचे नाव आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाला वर्दी मिळाली की, जुन्या पोस्ट ऑफिस जवळ, श्रद्धा अपार्टमेंट येथे एक इसम राहत्या घरात दार बंद करुन आत्महत्येचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार पोलीस तसेच सनसिटी येथील अग्निशमन वाहन तातडीने रवाना करण्यात आले.

घटनास्थळी पोहचताच अधिकारी व जवानांनी (Sinhagad) लगेचच पोलिसांकडून माहिती घेत बचावकार्यला सुरुवात केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरामधे एका इसमाचा ओरडण्याचा आवाज येत होता. हा प्रकार घडत असताना जवानांनी मुख्य लाकडी दरवाजा व लोखंडी दरवाजा याला बोल्ड कटर हे उपकरण वापरत पोलिसांच्या परवानगीने तोडून आतमध्ये प्रवेश केला. स्वयंपाक घरामध्ये सदर इसम पंखा व गळ्यामध्ये नायलॉनची दोरी अडकवून एका लाकडी स्टुलवर उभा असलेला दिसून आला. तातडीने जवानांनी दोरी तोडत त्याला खाली उतरवून वेळेवर त्याची सुखरुप सुटका करत त्याला जीवदान दिले. या ठिकाणी उपस्थित पोलिसांनीही अग्निशमन दलाला मोठी मदत केली.

ही बचाव माहीम सिंहगड अग्निशमन केंद्र अग्निशमन अधिकारी प्रभाकर उम्राटकर, चालक संतोष चौरे व फायरमन सतीश डाकवे, संजू चव्हाण व मदतनीस कोकरे यांनी पार पाडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.