Pimpri News : पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील दैनंदिन प्रवाशांना मासिक पास देऊन सिंहगड, सह्याद्री एक्सप्रेस सुरु कराव्यात

पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरून दैनंदिन प्रवास करणा-या प्रवाशांना मासिक पास द्यावा. तसेच सिंहगड एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस या दोन रेल्वेगाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. संघाने याबाबतचे पत्र उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे.

रेल्वे प्रवासी संघाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना साथीच्या काळात टाळेबंदीमुळे पुणे-मुंबई रेल्वे सेवा बंद करण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने पुणे-मुंबई मार्गावरील डेक्कन क्वीन आणि इंद्रायणी एक्सप्रेस या रेल्वे सुरु झाल्या आहेत. डेक्कन क्वीन एक्सप्रेस ही सुपरफास्ट असल्याने ती रेल्वे पुणे-लोणावळा-दादर याच स्थानकांवर थांबते. त्यादरम्यान तिला एकही थांबा नाही. त्यामुळे पुणे-लोणावळा दरम्यानच्या तसेच कर्जत, कल्याण व ठाणे या स्थानकांवर उतरणा-या शेकडो प्रवाशांची गैरसोय होत आहे.

सकाळी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी सिंहगड एक्सप्रेस व संध्याकाळी परतीच्या प्रवासासाठी सह्याद्री एक्सप्रेस या दोन गाड्या पुणे-मुंबई मार्गावर दैनंदिन प्रवास करणा-या नागरिकांसाठी सोयीच्या आहेत. तसेच पुणे-मुंबई दररोज प्रवास करणारे प्रवासी शासकीय कर्मचारी तसेच खाजगी आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार आहेत. शासकीय कर्मचा-यांना दररोज कार्यालयात येणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच खाजगी आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार कामावर उपस्थित न राहिल्यास त्यांचा पगार कपात केला जातो.

प्रवासाची योग्य सोय नसल्याने कामावर रुजू न होऊ शकलेल्या अनेक कामगारांच्या नोकरीवर गदा आली आहे. हे सर्व कर्मचारी, कामगार मध्यमवर्गीय आहेत. त्यामुळे त्यांना रेल्वेचे रोजचे आरक्षण करणे व महिन्याला पाच ते सहा हजार रुपये खर्च करणे परवडणारे नाही. पुण्याहून मुंबईला उदरनिर्वाहासाठी येणा-यांसाठी रेल्वे हे अतिमहत्त्वाचे, वेगवान आणि सहज साधन आहे. त्यामुळे पुणे-मुंबई रेल्वे दैनंदिन प्रवास करणा-या सर्वांसाठी पूर्वीप्रमाणे मासिक पासची सुविधा द्यावी. सिंहगड, सह्याद्री एक्सप्रेस या गाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघ, पिंपरी चिंचवड यांच्याकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.