BNR-HDR-TOP-Mobile

वनराणीचे जनक

841
PST-BNR-FTR-ALL

(अमेय गुप्ते)

एमपीसी न्यूज- नेरळ माथेरानच्या वनराणीचे जनक सर आदमजी पीरभॉय यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख

आपल्या देशासाठी दाऊदी बोहरी मुसलमान समाजाचेही योगदान आहे. डॉ. सय्यदना महमद बुऱ्हाणउद्दीन यांच्यासारखे थोर शिक्षणतज्ञ व दाऊदी बोहरा समाजाचे 49 वे दाई होऊन गेले. तर व्यापारी-उद्योग व दळणवळणाच्या दृष्टीने नेरळ-माथेरान या मार्गावर स्वखर्चाने रेल्वे सेवा सुरू करणारे थोर दानशूर व्यक्ती म्हणजे सर आदमजी पीरभॉय. ते इंग्रजांच्या काळातील एक मोठे भारतीय उद्योगपती, समाजसुधारक असून परोपकारी होते. त्यांचा जन्म दि. 13 ऑगस्ट, 1846 मध्ये गुजरात राज्यातील गोंडळ या संस्थानात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडीलांचे नाव कादीरभाई पीरभॉय तर मातोश्रींचे नाव सकीनाबानू.

बालपणापासून त्यांच्या अंगी परिश्रम करण्याची तयारी होती. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षापासून त्यांनी व्यवसायाला सुरूवात केली. प्रथम ते रस्त्यावर काड्यापेट्या विकत असत. यात अनेक वर्षे गेली, पण अचानक त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. शेठ लखमजी व लेफ्टनंट स्मिथ यांच्या मदतीने ते कापूस उद्योगात आले व अथक परिश्रम करून भारतातील मोठे कापूस उत्पादक झाले. त्यांनी सूतगिरणी सुरू करून त्याकाळी सुमारे 15,000 कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच इंग्रजांच्या सैन्याच्या तंबूसाठी लागणारे कॅनव्हासचे कापड व सैनिकांच्या गणवेशाचे खाकी कापड यांचा पुरवठा ते करू लागले. पुढे ते आशिया खंडातील एका टाकसाळीचे मालक झाले. त्याचप्रमाणे जहाजबांधणी आणि इतर उद्योगातून त्यांनी अमाप संपत्ती मिळवली.

आदमजींचे सामाजिक योगदान मोठे आहे. त्यांनी सन 1884 मध्ये मस्जीद, विश्रांतीगृह, कबरस्थान व चर्नीरोड रेल्वे स्टेशन समोर अमनबाई धर्मादाय रूग्णालय बांधले तसेच गरीब आणि गरजूंसाठी त्यांनी इमारतीही बांधल्या. सन 1877 व 1897 मध्ये गुजरातमध्ये दुष्काळ पडला होता. त्या वेळेस त्यांनी दुष्काळग्रस्त जनतेसाठी अन्नधान्याचे वाटप केले. तसेच सन 1892 मध्ये प्लेगची साथ पसरली. त्या वेळेस प्लेगच्या रूग्णांसाठी त्यांनी अनेक डॉक्टरांची नेमणूक करून लस व औषधे परदेशातून मागवली व मुंबईतील अमनबाई धर्मादाय रूग्णालयात ती रूग्णांना मोफत दिली. सन 1897 मध्ये मुंबईचे पहिले नगरपाल म्हणून त्यांची नेमणूक झाली. तसेच इंग्रज सरकारने त्यांना सर ही पदवी बहाल केली व ‘जस्ट ऑफ पीस’ या पदावर त्यांची नेमणूक केली तसेच मुस्लीम लीगचे ते पहिले अध्यक्ष झाले.

1907 मध्ये कराची येथे झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना कैसर हिंद या पदवीने गौरविण्यात आले. मोहम्मदेन शैक्षणिक परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांना त्यांच्या समाजाने रफीउद्दीन ही मानाची पदवी दिली. त्यांनी मक्का-मदीना व काठीयावाड येथे अनेक अनाथाश्रम काढले. 27 शाळा बांधल्या. प्रिन्स ऑफ वेल्स वैज्ञानिक संस्थेची त्यांनी अलीगड येथे स्थापना केली.

अलीगड मुस्लीम विद्यापीठ उभारणीत त्यांचा मोठा वाटा आहे. यासाठी त्यांनी अर्थसहाय्य केले. 1907 साली त्यांनी नेरळ-माथेरान या मार्गावर लोहमार्ग टाकून रेल्वेसेवा सुरू केली. त्याकरीता त्यांना 16 लाख रूपये खर्च आला. या कार्यात त्यांचे पुत्र अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय यांचे सहाय्य लाभले. या रेल्वे मागील एक आठवण म्हणजे एका आदमजींना नेरळहून माथेरानला जायचे होते. त्यावेळी तेथे जाण्यास घोड्यांचा वापर होत असे. त्यांनी एका घोडेस्वाराला विनंती केली की, “मला माथेरानला जायचे आहे, तेव्हा तुझ्या पाठी घोड्यावर बसवून मला घेऊन जा” त्यावर घोडेस्वाराने त्यांना नकार दिला. त्यावर आदमजी म्हणाले. ठीक आहे एक दिवस मी स्वत:ची रेल्वेसेवा सुरू करून अनेक लोकांना एकत्र घेऊन जाईन. व या जिद्दीने त्यांनी कार्य करून प्रत्यक्षात रेल्वेसेवा सुरू केली.

ही गाडी गेली 107 वर्षे नेरळ-माथेरान प्रवास करत आहे. प्रथम ही रेल्वे त्यांची खाजगी होती व 1947 साली स्वातंत्र्यानंतर ती रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत आली. या गाडीची सामुग्री त्याकाळी आदमजींनी जर्मनीतून आणली. रेल्वेच्या लोहमार्गाचा पूर्वी नॅरो गेज हा प्रकार होता तो आता या गाडीच्या रूपाने फक्त अस्तित्वात राहिला आहे. दि. 19 ऑगस्ट, 1913 मध्ये वयाच्या 67 व्या वर्षी आदमजी पैगंबरवासी झाले. त्यांनी केलेले कार्य चिरकाल टिकून इतिहासात त्यांची नोंद कायमस्वरूपी राहिल यात शंका नाही.

 

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.