Chakan : चाकण आंदोलनाचा तपास करणार ‘एसआयटी’

एमपीसी न्यूज – सकल मराठा समाजाच्या वतीने 30 जुलै 2018 रोजी खेड-चाकण बंदची हाक देण्यात आली. नागरिकांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकल मराठा समाजाच्या वतीने चाकण मध्ये एक रॅली काढून बंद संपल्याचे जाहीर केले. सर्वजण शांततेत घरी जात असताना अचानक आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि काही क्षणात शांत नागरिकांनी उग्र रूप धारण केले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. हे पथक आता प्रकारच्या मुळाशी जाऊन पुढील तपास करणार आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या चाकण बंदला हिंसक वळण लागल्याने पोलिसांची वाहने, खासगी वाहने जाळण्यात आली, दगडफेक केल्याने अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी गंभीर झाले. यावेळी हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू झाले, त्यामध्ये चाकण पोलीस ठाण्याचा समावेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात झाला. चाकण हिंसाचार प्रकरणाचा तपास लवकर तपास व्हावा यासाठी  ‘एसआयटी’ (विशेष तपासी पथक) ची स्थापना केली आहे. या पथकाने केलेल्या तपासातून जाळपोळ, तोडफोड, दगडफेक करणा-या अधिकाधिक लोकांना अटक केले जाणार आहे.

विशेष तपास पथक (एसआयटी)

पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (प्रमुख), चाकण विभागाचे सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत अलसटवार, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, चाकणचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम तांगडे, सुधाकर काटे

काय करणार एसआयटी –
चाकण हिंसाचार प्रकरणाच्या तळाशी जाऊन या संपूर्ण प्रकरणासाठी कारणीभूत लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सीसीटीव्ही फुटेज, अन्य फोटो, व्हिडिओ यांच्या माध्यमातून आरोपींची ओळख करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. आंदोलन हिंसक होण्याचे कारण शोधून यामागे एखादी राजकीय, सामाजिक इच्छाशक्ती काम करत आहे का, याबाबत माहिती मिळविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिले आहेत.

30 जुलै 2018 रोजी काय झाले?

# सकाळी 11 वाजता मराठा मोर्चाच्या स्थानिक आंदोलकांनी मार्केट यार्ड चाकण येथून पायी रॅली काढली.
# हायस्कूल शाळेतील शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
# त्यानंतर ही रॅली घोषणा देत महात्मा फुले चौक, नगरपरिषद मार्गे मुख्य रस्त्याने माणिक चौकातून पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात आली.
# तळेगाव चौकात हजारो आंदोलक महामार्गावर दुचाक्या लावून वाहने अडवून बसले होते.
# दुपारी एक वाजता मराठा मोर्चाच्या आयोजकांनी हे आंदोलन संपल्याचे जाहीर केले.
# सर्व आंदोलक शांततेत घरी जात असताना अचानक जाळपोळ सुरू झाली.
# आंदोलकांनी गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांवर दगडफेक चालू केली.
# एसटी बस जाळल्या, अग्निशामक बंब पेटविला, दुचाकी, खासगी वाहने, तळेगाव चौकातील वाहतूक नियंत्रण पोलीस चौकी, पोलीस व्हॅन जाळल्या.
# पोलीस अधिकाऱ्यांची वाहने पेटवून दिली. पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. यामध्ये अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी गंभीर जखमी झाले. एक पोलीस अनेक दिवस कोमात होता.
# चाकण पोलीस ठाण्यावर देखील दगडफेक केली. पोलीस ठाण्यासमोरील दोन मोटारी पेटवून दिल्या.
# पुरावा नष्ट व्हावा म्हणून ज्या-ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत ते कॅमेरे हातातील दांडक्यांनी व गजांनी फोडून टाकले.
# पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केले.
# जमावबंदीचा आदेश लागू केला. यानंतर वातावरण निवळले.
# पुणे ग्रामीण पोलिसांनी सुमारे चार ते पाच हजार आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. काहींना अटक देखील केली.
# 15 ऑगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वतंत्र झाले आणि चाकणचा समावेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात झाला. यामुळे चाकण पोलीस ठाण्यात दाखल असणारे गुन्हे वर्ग झाले.
# पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार घेतल्यापासून चाकणच्या हिंसक आंदोलनाची माहिती घेण्यास सुरुवात केली.
# चाकण हिंसाचार प्रकरणाचा कसून तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी)ची स्थापना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.