Dighi News : आईच्या मृतदेहाजवळ बसून उपाशीपोटी काढले दोन दिवस; दीड वर्षीय बाळाला घेण्यासाठी शेजारी धजावले नाहीत

दुर्गंधी आल्यावर नागरिकांनी केला पोलिसांना फोन

एमपीसी न्यूज – माणसाने माणसाच्या मदतीला धावून जाणं कोरोनाच्या भीतीमुळे बंद केलंय. जिवंत माणसाला हात लावण्यास देखील सध्या कोणी धजावत नाही. त्यात जर कोणी मृतावस्थेत पडले असेल तर विचारायलाच नको. असाच प्रकार दिघी येथील फुगेवस्तीमध्ये सोमवारी (दि. 26) घडला आहे.

माणसांनी माणसांशी माणसासम वागणे बंद केले असले तरी पोलीस त्यांची समाजाप्रती आत्मीयता आणि बांधिलकी सिद्ध करत आहेत. दोन दिवसांपासून मृतावस्थेत पडलेल्या आईच्या शेजारी बसून असलेल्या एका दीड वर्षीय बाळाला शेजा-यांनी घेण्यास नकार दिला असता दिघी पोलीस ठाण्यातील दोन महिला पोलिसांनी भुकेने व्याकुळ असलेल्या बाळाला मायेने जेऊ घातले.

सरस्वती राजेशकुमार (वय 29, रा. फुगेवस्ती, दिघी. मूळ रा. उत्तरप्रदेश) मृत महिलेचे नाव आहे. दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सरस्वती या आपल्या पतीसह कामासाठी भोसरी येथे आल्या होत्या. मात्र गावाकडे निवडणूका असल्याने पती महिनाभरापूर्वी गावी गेला होता. तेव्हापासून सरस्वती आपल्या मुलाला घेऊन फुगेवस्ती येथे राहत होत्या.

फुगेवस्ती येथे एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिघी पोलिसांना नागरिकांनी दिली. त्यानुसार दिघी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घर आतून कडी लावून बंद असल्याचे दिसून आले. खिडकीमधून गजाच्या साहाय्याने दरवाजाची कडी काढली. त्यावेळी घरामध्ये सरस्वती या मृत अवस्थेत दिसून आल्या.

आईच्या मृतदेहाशेजारी अवघ्या दिड वर्षांचा मुलगा निपचित पडून होता. मुलगा अन्नपाण्यावाचून व्याकूळ होता. यामुळे शेजारील महिलेला सांभाळ करण्याची विनंती पोलिसांनी केली. मात्र करोनाच्या भितीमुळे कोणीही त्या बाळास घेण्यास तयार झाले नाही.

अखेर दिघी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांना मुलाचा सांभाळ करण्यासाठी बोलावून घेतले. त्या दोघींनीही बाळाला दुध बिस्कीट खाऊ घातले. त्यानंतर त्या बाळाला थोडीशी तरतरी आली. पुढील उपचारासाठी बाळाला रूग्णालयात दाखल केले. बाळाची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यास दिघी येथील शिशुगृहात ठेवले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

तर मयत सरस्वती राजेश कुमार यांचे वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण न समजल्याने डॉक्‍टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. दरम्यान बाळाच्या वडिलांना ही घटना पोलिसांनी कळवली आहे. ते उत्तरप्रदेशमधून भोसरी येथे येण्यास निघाले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले. महिला पोलीस कर्मचारी सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांनी बाळाबद्दल दाखवलेल्या मायेचे कौतुक सर्वत्र होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.