Pimpri: स्वाईन फ्ल्यूचा कहर; तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूने कहर माजविला आहे. गेल्या तीन दिवसात ‘स्वाईन फ्लू’ने सहा जणांचा बळी घेतला आहे. तर, रविवारी एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असून मृतांचा आकडा 20 वर गेला आहे. त्यामुळे शहर परिसरात घबराट निर्माण झाली आहे. 

पाऊस आणि वाढत असलेल्या हवेतील गारव्यामुळे ‘स्वाईन फ्लू’ने पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये डोके वर काढले आहे.  या रोगाचा प्रभाव हा दिवसेंदिवस वाढतच आहे.  शुक्रवारी (दि.7)भोसरी येथील एका 25 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे.

शनिवारी (दि.8)वडगाव मावळ  येथील एका 53 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला असून रविवारी (दि.9) एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाळुंगे येथील 33 वर्षीय पुरुष, काळेवाडीतील 45 वर्षीय महिला, चिंचवड येथील एका 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) रावेत येथील एका 63 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला  आहे. यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सौम्य ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशी लक्षणे स्वाईन फ्लूच्या प्राथमिक अवस्थेत आढळून येतात. आजाराच्या पुढील टप्प्यात 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक ताप, तीव्र घसादुखी, घशाला सूज येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, रक्तदाब कमी होणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, नखे निळसर काळी पडणे, लहान मुलांमध्ये चिडचिड, झोपाळूपणा अशी लक्षणे दिसून येतात.

सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळल्यानंतर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमिफ्ल्यूच्या गोळ्या घ्याव्यात, त्याचबरोबर प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.