Charholi : ‘रस्त्याचे संथ गतीने काम, अपघाताच्या संख्येत वाढ; ठेकेदाराच्या कार्यालयाला ठोकले टाळे’

जखमींना नुकसान भरपाई द्यावी, सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची नगरसेविकेची मागणी  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या च-होली फाटा ते च-होलीगाव या डीपी रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. ठेकेदाराने सुरक्षिततेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. संतप्त महिलांनी ठेकेदाराच्या कार्यालयाला टाळे ठोकले असून अपघातात जखमी झालेल्यांना भरपाई देण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका विनया तापकीर यांनी केली. जोपर्यंत भरपाई देत नाही, तोपर्यंत कार्यालयाचे टाळे काढणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका तापकीर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या च-होली फाटा ते च-होलीगाव या डीपी रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. रस्ता विकसित करताना संबंधित ठेकेदाराने नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षात या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून दिवसें-दिवसत अपघातांची संख्या वाढली आहे. जीवितहानी देखील झाली आहे.

ठेकेदाराला सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची सूचना करुनही त्याची दखल घेतली जात नाही. मंगळवारी (दि.25) या रस्त्यावर अपघात होऊन दोन नागरिक जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताला प्रशासन व ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप करत आणखीन किती जणांचा बळी घेतले जाणार आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वारंवार होणा-या अपघातामुळे संतप्त महिलांनी ठेकेदाराच्या कार्यालयाला टाळे ठोकले असून जोपर्यंत सुरक्षिततेची साधने लावली जात नाहीत.  अपघात ग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जात नाही, तोपर्यंत कार्यालयाचे टाळे उघडणार नाही. रस्त्याचे काम देखील सुरु करु दिले जाणार नाही, असा इशाराही नगरसेविका तापकीर यांनी निवेदनातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.