Lonavala News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात मळीचा टँकर उलटला, काही काळ वाहतूक विस्कळीत!

एमपीसी न्यूज : मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात किमी 40 जवळ मुंबईच्या दिशेने गुळाची मळी घेऊन जाणारा टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने पुणे लेनवर विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाला. यामुळे टँकर मधील मळी रस्त्यावर पसरल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती समजताच बोरघाट पोलीस, आयआरबीचे पथक व अपघातग्रस्तांच्या मदतीला सामाजिक संस्थेचे सदस्य व देवदूत पथका दाखल झाले. या सामाजिक संस्थेचे सदस्य व देवदूत पथकाने जखमी चालकाला गाडीतून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

टँकर मधील गुळाची मळी पुणे लेनवर पडल्याने पुणे बाजूकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. आयआरबी व खोपोली नगरपरिषदेचे अग्नीशमन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. रोडवर पडलेली मळी आयआरबी व खोपोली नगरपालिकेकडील फायर ब्रिगेडच्या सहाय्याने पाणी मारून हटविण्यात आली असून तिन्ही लेन वाहतुकीस चालू करण्यात आली असल्याची माहिती बोरघाटचे पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.