Pimpri News: एलबीटीच्या नोटीस कायमस्वरूपी रद्द करा, लघुउद्योजक संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज – स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) बंद झाला. त्याच वेळेस उद्योजकांकडून सर्व रक्कमेची वसुली केलेली असताना देखील पिंपरी-चिंचवड महापालिकेने एलबीटीच्या नोटीसा काढून उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले आहे. त्यामुळे एलबीटीच्या रक्कमेच्या बिलाची नोटीस कायमस्वरूपी रद्द करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने महापालिकेकडे केली.

लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने एमआयडीसीतील विविध मागण्यांसाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, संचालक नवनाथ वायाळ, संचालक प्रमोद राणे तसेच महापालिकेचे संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने औद्योगिक परिसरातील उद्योजकांना एलबीटीची बाकी नसलेली रक्कम व्याज व शास्ती दंडासह भरण्याच्या नोटीसा पाठविल्या आहेत. त्यामुळे सध्या वाढलेल्या कच्च्या मालाच्या किंमती, वाढलेला वीजदर, लेबर तुटवडा, काम केल्यानंतर कामाचे बिल वेळेवर न मिळणे अशा विविध कारणांनी हैराण झालेल्या उद्योजकांना आता महापालिकेने पाठविलेल्या एलबीटीच्या नोटीसीमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेला उद्योजक हा आता पूर्णपणे नेस्तानाबूत होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

महापालिकेने एलबीटी लावल्यानंतर उद्योजकांनी पालिकेने मागितलेली सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा आता ‘हा पेपर द्या’, ‘तो पेपर द्या’ सर्व पेपरची वेळेवर पूर्तता करा अशा नोटीसा बजावलेल्या आहेत. एलबीटी बंद झाला. त्याच वेळेस उद्योजकांकडून सर्व रक्कमेची वसुली केलेली असतांना देखील महापालिकेने नोटीसा काढून उद्योजकांत भीतीचे वातावरण तयार केले आहे.

जर उद्योजकांकडे एलबीटी रक्कमेची बाकी होती, तर आतापर्यंत महापालिकेने तशी कल्पना द्यायला हवी होती. परंतु, तसे काही केले नाही आणि आता एलबीटी रक्कम आणि त्यावर शंभर टक्के व्याज व त्यावर शास्तीची रक्कम लावून एलबीटीची बिले दिली आहेत. एलबीटीच्या रक्कमेच्या बिलाची नोटीस कायमस्वरूपी रद्द करावी, उद्योजकांना दिलासा द्यावा, अशी मागणी लघुउद्योजक संघटनेने केली.

त्यावर आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ”एलबीटी नोटिशीची सविस्तर तपासणी केली जाईल. ज्या उद्योजकांनी एलबीटी रकमेचा भरणा केला आहे. त्यांची नोटीस रद्द करण्यात येईल. एलबीटी रक्कमेचा भरणा करण्यासाठी मिळकत जप्त केली जाणार नाही. एलबीटीची रक्कम भरण्याकरिता मुदत वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.