Pimpri: ‘उद्योजक कामगारांचे वेतन देण्यास तयार, कार्यालय उघडण्यास परवानगी, वाहन पास द्या’ 

पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेची पोलिसांकडे मागणी

एमपीसी न्यूज – सरकारच्या आदेशाप्रमाणे ‘लॉकडाऊन’मध्ये उद्योजक कामगारांचे वेतन देण्यास तयार आहेत.  कामगारांचे  पगार करण्याकरिता कार्यालय  उघडण्यासाठी परवानगी द्यावी. उद्योजक, कर्मचा-यांना किमान तीन दिवसाचा वाहन पास द्यावा.  अर्ज करण्यासाठी त्वरित लिंक तयार करावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड  लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष  संदीप बेलसरे यांनी पोलिसांकडे केली आहे.

याबाबत पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांना पत्र दिले आहे. त्यात बेलसरे यांनी म्हटले आहे की, देशामध्ये तीन आठवड्यांचा  लॉकडाउन  जाहीर केल्यामुळे  बाजार पेठा, कंपन्या, कार्यालये  बंद आहेत. कार्यालयामध्ये कर्मचारीच नसल्यामुळे कमर्चाऱ्यांचे  मार्च  महिन्याचे वेतन कसे द्यायचे असा प्रश्न उद्योजकांना पडला आहे. किमान कंपन्यांच्या अकाउंट व  मनुष्यबळ  विभागातील  कर्मचारी व मालक वर्गाला कार्यालयात येण्याची  परवानगी  द्यावी  अशी मागणी उद्योजकांकडून  करण्यात  येत आहे.

कोरोना  विषाणूचा प्रसार साखळी  तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र  मोदी  यांनी  14 एप्रिल  पर्यंत लॉकडाउन  घोषित केला आहे. त्यामुळे उद्योजक व कर्मचारी कामावर हजार राहू शकत नाही.  कर्मचाऱ्यांचे  मार्च  महिन्याचे  वेतन  कसे देणार तसेच अन्य कंपन्यांचे देणे कसे देणार असा प्रश्न उद्योजकांपुढे उभा राहिला आहे.

पुणे पोलिसांनी  अत्यावश्यक  कामाच्या  परवानगीसाठी  https://www.punepolice.in/  लिंक चालू केली आहे. त्याप्रमाणे  पिंपरी-चिंचवड पोलिसांनी  फक्त उद्योजकांसाठी लिंक चालू करावी. उद्योजक,अकाउंट  व मनुष्यबळ  विभागातील  कर्मचारी यांच्यासाठी  किमान तीन दिवसाचा  पास वितरित करण्यात यावा. शासनाच्या आदेशाप्रमाणे  उद्योजक कर्मचाऱ्यांचे  वेतन देण्यास तयार आहेत. त्यासाठी पास देण्याची विनंती बेलसरे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.