pimpri : ‘स्मार्ट सिटी म्हणजे निव्वळ भंपकपणा, स्मार्ट एरियावरच पैशांची उधळपट्टी’

सल्लागार समिती सदस्यांची नाराजी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात मूळ हेतूलाच हरताळ फासला जात आहे. स्मार्ट सिटी नव्हे तर स्मार्ट एरियाच विकसित केला जात आहे. पैशांची नाहक उळधपट्टी केली जात आहे. करोडो रुपये खर्चून शो-बाजी केली जात आहे. पैशांचा योग्य विनियोग केला जात नाही, अशी हरकत स्मार्ट सिटीच्या स्थानिक सल्लागार समितीच्या सदस्यांनी घेतली. तसेच विरोधात बोलायला विरोधक नाहीत. तर, आमचा आवाज दाबला जात आहे. स्मार्ट सिटीला मुख्य कार्यकारी अधिकारी देखील स्वतंत्र नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीअंतर्गत विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तीची स्थानिक सल्लागार समिती (स्मार्ट सिटी अॅडव्हायजरी फोरम)ची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य तुषार शिंदे, धनंजय शेडबाळे, अमित तलाठी यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषद घेऊन स्मार्ट सिटीतील कामावर नाराजी व्यक्त केली. तसेच स्मार्ट सिटीची तक्रार पंतप्रधान, मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्प 1149 कोटीचा आहे. या पैशांचा योग्य पद्धतीने विनियोग होणे आवश्यक आहे. एरिया बेस डेव्हलपमेंटअंतर्गत पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर या भागाचा विकास केला जात आहे. या भागासाठी तब्बल 593 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे क्षेत्रफळ केवळ साडेचार स्व्केअर किलो मीटर आहे. उर्वरित भागासाठी केवळ 535 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मुळातच हा भाग शहरातील सर्वांत विकसित, सर्व सोयी-सुविधा युक्त असलेला आहे. हा भाग स्मार्ट सिटीत कसा निवडला हा संशोधनाचा विषय आहे?. या स्मार्ट भागाचांच विकास करणे कितपत योग्य आहे? असा सवाल तुषार शिंदे यांनी केला.

सुनियोजित भागात स्मार्ट सिटीचा पैसा खर्च केला जाऊ नये.  शहराचा समान विकास होणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असलेली कामे स्मार्ट सिटीअंतर्गत होत नाहीत. नागरिकांना समोर ठेऊन कामे केली जात नाहीत.  स्मार्ट सिटीअंतर्गत केवळ शो-बाजी केली जात आहे. महापालिकेच्यां कामानांच लाली-पावडर लावून स्मार्ट सिटीची कामे असल्याचे नागरिकांना भासविले जाते. केवळ कागदावर स्मार्ट सिटी आहे. प्रत्यक्षात मात्र काम शुन्य आहे.  स्मार्ट सिटीअंतर्गत कॉपी पेस्टचे प्रकल्प नकोत, शहरवासियांना आवश्यक असे प्रकल्प राबविण्यात यावेत.

शहरवासियांना आवश्यक असलेल्या कामावर पैशांचा खर्च होत नाही. फायबर ऑप्टीकल, स्ट्रीट स्केपिंगसाठी तब्बल 520 कोटी रुपये खर्च करणे योग्य आहे का?,  पुण्यात वायफायचे व्हॉट्सस्पॉट बंद झाले आहेत. त्यासाठी 27 कोटी रुपये खर्च करणे गरजेचे नाही.  पिंपळेसौदागर भागात उद्यानासाठी 53 कोटी रुपये, मैदानांसाठी 25 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे योग्य नाही. सल्लागार समितीत एका पक्षाचे पदाधिकारी जास्त आहेत. बाकीच्या पक्षांचे पदाधिकारी गांभीर्याने पाहत नाहीत. आमचे मत मान्य केले जात नाही. आवाज दाबला जातो. त्याकरिता  सर्व पक्षांनी स्मार्ट सिटीच्या कामाकडे गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.

एकाच कामासाठी महापालिका, स्मार्ट सिटीअंतर्गत पैसे खर्च होत नाहीत ना?, याची खातरजमा करणे आवश्यक आहे. महापालिकेचा विकास आराखडा, स्मार्ट सिटी, मेट्रोचे एकत्रिकरण करुन विकास कामे करणे अपेक्षित आहे. पाणीपुरवठा, वाहतूक, रेन हॉर्वेस्टिंग प्रकल्पाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सायकल शेअरिंग प्रकल्प सुरु केला. तो काही दिवसच सुरु राहिला. आता सायकली धूळ खात पडून आहेत. त्यामुळे प्रकल्प राबविताना विचार करुन राबवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.