Smart City News : स्मार्ट सिटीच्या कामाला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडकडून शहरात स्मार्ट सिटीची कामे सुरु आहेत. या कामांना काही ठिकाणी विरोध होत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा विरोध करणा-यांवर भारतीय दंड विधान कलम 353 (सरकारी कामात अडथळा) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची अकरावी बैठक आज (शुक्रवारी, दि. 11) चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे झाली. बैठकीसाठी संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश बोलत होते.

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरु आहेत. या कामांमध्ये काही ठिकाणी खोडा आणल्याचे तसेच जाणीवपूर्वक विरोध केल्याचे प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास येत आहेत. अशा विरोधामुळे कामांसाठी विलंब होत आहे. यामुळे संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला.

जाणीवपूर्वक कामांमध्ये अडथळे निर्माण करणा-यांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याच्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली. माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल काटे आणि माजी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्या जागी या दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.