Smart City News: चऱ्होली , मोशी, तळवडे, किवळे, रावेत, पुनावळे, दापोडी, फुगेवाडीचा स्मार्ट सिटीअंतर्गत होणार विकास

महापालिकेचे उत्पन्न वाढ लक्षात घेवून 'एबीडी'त नवीन भागाचा समावेश

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीतील दुस-या टप्प्यात एरिया बेस अंतर्गत (एबीडी) पिंपरी-चिंचवड शहरातील नवीन भागाचा समावेश केला जाणार आहे. त्यात च-होली, मोशी, तळवडे, किवळे, रावेत, पुनावळे, दापोडी, फुगेवाडी या भागाचा समावेश करण्यात यावा का, याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. स्मार्ट सिटीअंतर्गत कोणत्या भागाचा विकास करावा याबाबतचा अंतिम निर्णय महासभा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची बारावी बैठक आज (शुक्रवारी) ॲटो क्लस्टर येथील स्मार्ट सिटीच्या कार्यालयात पार पडली. ‘पीसीएससीएल’चे अध्यक्ष डॉ. नितीन करिर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. ते ऑनलाईन सहभागी झाले होते.

स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्मार्ट सिटीचे संचालक महापौर उषा ढोरे, सभागृह नेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन चिखले, केंद्र सरकारच्या प्रतिनिधी ममता बात्रा, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, राजन पाटील, वित्तीय अधिकारी जितेंद्र कोळंबे उपस्थित होते.

तर, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप ऑनलाईन सहभागी झाले होते. विषयपत्रिकेवर 22 विषय होते. त्यातील RFP 2, RFP 3 या दोन्ही निविदेच्या सिस्टीम इंटीग्रेटर यांच्या पत्रामधील मागणीनुसार प्रकल्पांच्या कामाकरिता विनादंड मुदतवाढ देण्याचा विषय तहकूब करण्यात आला. वित्तीय अधिकारी जितेंद्र कोळंबे यांचा राजीनामा मंजूर करुन त्यांच्याजागी सुनील भोसले यांची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली.

पत्रकारांना माहिती देताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”एरिया बेस अंतर्गत दुस-या टप्प्यात नवीन भागाचा समावेश केला जाणार आहे. कोणता भाग, कोणत्या तत्वावर निवडावा याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्या भागाच्या आजच्या स्थितीत झालेला विकास, किती आरक्षणे विकसित झाली आहेत.

अविकसित, ग्रीन क्षेत्र किती आहे. रहिवासीकरण किती झाले आहे. व्यावासायिक दृष्टीने विचार करता मॉल आहेत का, नोक-या उपलब्ध होवू शकतील का, नागरिकांच्या गरजा पूर्ण होतील का, किफायतशीर दरात घरे उपलब्ध होतील का, व्यावासायिक, निवासी मालमत्तांची किती वाढ होईल. त्यामुळे मालमत्ता करातून भविष्यात महापालिकेला उत्पन्न किती मिळेल याचा विचार करुन एबीडी अंतर्गत नवीन भागाचा समावेश करुन विकास केला जाणार आहे.

च-होली, मोशी, तळवडे, किवळे, रावेत, पुनावळे, दापोडी, फुगेवाडी, भोसरीतील गुंतागुंतीचा पण पूर्वी विकास झालेल्या भागाचा एबीडी अंतर्गत समावेश करण्याबाबत चर्चा झाली. त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एबीडी अंतर्गत कोणत्या भागाचा विकास करायचा याचा अंतिम निर्णय महासभा घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्याबाबत मास्टर प्लॉन तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच सुरु केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सभागृह व प्रसारण विकासाच्या अहवालावर चर्चा करुन मान्यता देण्यात आली. बजाज ग्रामविकास संस्थेसोबत एमओयू करण्यात आला. तसेच सॅडविक कंपनी सीएसआरअंतर्गत महापालिकेच्या चार शाळांना अटल टिंकरिंग लॅब देणार आहे. त्यांच्यासोबतही एमओयू करण्यात आला. स्मार्ट सिटी करिता दक्षता समिती नेमण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.