Wakad News : स्मार्ट सिटीच्या कामाचा सोसायटी धारकांना त्रास ; डक्ट तोडले, तीन महिन्यापासून विजेचा लंपडाव

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटीच्या दिशेने पिंपरी – चिंचवडची वाटचाल सुरू आहे. शहरात स्मार्ट सिटीची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. मात्र, या कामांचा फटका वाकड मधील सोसायटी धारकांना बसत आहे. विद्युत वाहिन्या तुटल्याने तीन महिन्यापासून विजेचा लंपडाव सुरू आहे. तसेच, पूर्वीचे डक्ट तोडून ती तशीच खुली ठेवल्याचा आरोप येथील रहिवाश्यांनी केला आहे.

दत्त मंदीर परिसर, वाकड येथे स्मार्ट सिटी अंतर्गत सध्या रस्त्याची कामे सुरू आहेत. मात्र, ही कामे करत असताना योग्य खबरदारी घेतली जात नाही, निष्काळजीपणाने काम केल्याने त्याचा फटका येथील रहिवाश्यांना बसत आहे. रस्ता खोदताना भूमिगत असलेल्या विद्युत वाहिन्या तुटल्याने परिसरातील अनेक सोसायट्यांचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. मागील तीन महिन्यापासून सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याचे येथील रहिवासी म्हणाले.

बहुतांश लोकांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज बंद झाल्याने पुन्हा ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. अशात मोबाईल लॅपटॉप चार्ज नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तसेच, मोठ्या इमारतीत चढ उतार करण्यासाठी लिफ्टची आवश्यकता असते. पण लाईट नसल्याने वारंवार जनरेटरचा वापर करावा लागतो आहे. त्यामुळे हजारो रूपयांचा अतिरिक्त खर्च वाढत आहे. असे रहिवासी म्हणाले.

शॉनेस्ट टॉवर, स्कायलाईन, होरिझोन, गणेश इम्पेरिया, प्लॅटिनम सोसायटी, चौधरी पार्क अशा दहा सोसाट्यांना याचा फटका बसत आहे.

शॉनेस्ट टॉवरमधील रहिवासी आणि पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनच्या अध्यक्षा तेजस्विनी ढोमसे सवाई म्हणाल्या, ‘मागील तीन महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. ऑफिस वर्क, शिक्षण, परिक्षा सगळे ऑनलाईन सुरू आहे. लाईट नसल्याने सर्व गोष्टी ठप्प झाल्यात. यामुळे माझ्या मुलीलाही ऑनलाईन परिक्षेला हजर राहता आले नाही. तसेच, स्मार्ट सिटीच्या कर्मचा-यांनी आमचे डक्ट तोडून पूर्वीपेक्षा लहान डक्ट बसवले व ते उघडेच ठेवले आहे. अधिकारी आणि कर्मचारी जबाबदारीने काम करत नाहीत,’ असा आरोप सवाई यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.