Pimpri: स्मार्ट सिटीचे ‘स्मार्ट’ संचालक जाणार बार्सिलोना दौ-यावर!

20 लाखाचा खर्च, स्थायीची आयत्यावेळी  मान्यता 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे पदाधिकारी आणि अधिकारी 11 ते 17 नोव्हेंबर 2018 दरम्यान स्पेन देशाच्या दौ-यावर जाणार आहेत. स्पेन येथील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणा-या ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौ-यासाठी येणा-या 20 लाख 21 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने आज (मंगळवारी) आयत्यावेळी मान्यता दिली.

स्मार्ट सिटीचे संचालक असलेले महापौर राहुल जाधव, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसेचे गटनेते सचिन चिखले, शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटी सेलचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण आणि सह शहर अभियंता राजन पाटील यांचा दौ-यात समावेश असणार आहे.

स्पेन देशातील बार्सिलोना शहरात 13 ते 15 नोव्हेंबर दरम्यान ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ड काँग्रेस 2018’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण ‘रिप्रेझेंटेटिव्ह स्मार्ट सिटी वर्ल्ड काँग्रेस’ यांच्याकडून पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीला मिळाले आहे. या परिषदेत जगातील शहरांच्या विकासासाठी भविष्यकालीन दुष्टीकोन, ध्येय ठरवून जगातील शहरे विकास करणे, शहर राहण्यायोग्य बनवणे, यावर मंथन होणार आहे. 400 तज्ज्ञ चर्चासत्रे, परिसंवादाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. त्याचा पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी उपयोग होणार आहे.

त्यासाठी स्मार्ट सिटीचे पाच संचालक आणि दोन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौ-याचे नियोजन मे. व्हीजन हॉलिडेज यांच्यामार्फत करण्यात आले आहे. विमानप्रवास, निवास, चहा, नाश्ता, भोजन, स्थानिक प्रवास, विमा यासह इतर अनुषंगिक बाबींसह येणा-या 20 लाख 21 हजार रुपये खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

दरम्यान, स्थायी समिती सदस्य राजू मिसाळ यांनी स्मार्ट सिटी संचालकांच्या दौ-यास पैसे देण्यास विरोध केला. स्मार्ट सिटीने त्यांच्या निधीतून दौरा करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, स्मार्ट सिटीच्या संचालकांची तातडीची बैठक घेणे शक्य नाही. त्यामुळे स्थायी समोर प्रस्ताव आणला आहे. कोठून तरी पैसे खर्च करायचेच आहेत. स्मार्टचे संचालक देखील आपलेच आहेत. त्यानंतर या दौ-याचा खर्च स्मार्ट सिटीच्या बैठकीत मंजूर करुन महापालिका निधीत खर्च करावा, अशा उपसूचनेसह हा विषय मंजूर करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.