Smart Crib : इनोव्हेशन ! निगडीतील स्मार्ट मॅामने तयार केला स्मार्ट पाळणा ; जागतिक पातळीवरील ‘टाईम्स’नेही घेतली दखल

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – लहान मुलांच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक असते. त्यांना झोपवणे हि एक कला आहे आणि त्यासाठी मातांना मोठी कसरत करावी लागते. निगडीतील राधिका पाटील यांच्या पहिल्या मुलीला फार कमी झोप होती, हलका आवाज देखील तिला झोपेतून जाग करायचा. मुलीच्या झोपेसाठी चिंतीत असलेल्या राधिका आणि त्यांचे पती भरत यांनी विविध पर्याय शोधले आणि त्यातूनच ‘स्मार्ट’ पाळण्याची संकल्पना उदयाला आली. या ‘स्मार्ट’ पाळण्याची दखल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘टाइम्स’ने देखील घेतली असून जगातील शंभर सर्वोत्तम शोधांमध्ये याची वर्णी लागली आहे.

राधिका पाटील आणि भरत यांनी स्मार्ट पाळण्यासाठी थेट अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली’ गाठली व ‘क्रेडलवाईज’ हि कंपनी स्थापन केली. त्यांच्या या प्रवासाबद्दल आणि स्मार्ट पाळण्याबद्दल जाणून घेण्यासाठी ‘क्रेडलवाईज’ कंपनीच्या सहसंस्थापिका राधिका पाटील यांच्याशी ‘एमपीसी न्यूज’ने संवाद साधला.

स्मार्ट क्रिब बाबत माहिती देताना राधिका पाटील म्हणाल्या, सहा वर्षांपूर्वी आम्हला पाहिली मुलगी झाली. ती फार हलक्या झोपेची होती. म्हणजे पावलांचा आवाज जरी झाला तरी तिला जाग यायची. तिला विनाव्यत्यय शांत झोप लागावी यासाठी आम्ही वेगवेगळे पर्याय केले. मग स्मार्ट क्रिबचा पाहिलं घरगुती मॉडेल आम्ही तयार केले.

त्यानंतर खूप संशोधन आणि माहिती गोळा करून त्याचे अत्याधुनिक मॉडेल तयार झालं. जे आज स्मार्ट क्रिब म्हणून ओळखलं जात. बाळ जागे होत आहे आणि त्याला अजून झोपेची गरज असेल तर हा पाळणा पुन्हा बाळाला झोके आणि शांत संगीत याच्या मदतीनं झोपवण्यास मदत करतो.

या पाळण्यात स्मार्ट बेबी मॉनिटर (निरीक्षक) बसवण्यात आला आहे. जो मुलाच्या हालचाली, श्वसन आणि डोळ्याची हालचाल यावर लक्ष ठेवून आवश्यक क्रिया करतो. हा मॉनिटर बाळाच्या झोपेच्या सवयीमधून सुद्धा माहिती एकत्र करून सूचना देतो आणि झोपेचे विश्लेषण करतो.

‘स्मार्ट क्रिब’ हे नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून दोन वर्षापर्यंच्या बाळासाठी उपयुक्त आहे. यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले असून तुम्ही कुठूनही आपल्या मुलावर लक्ष ठेऊ शकता.

या आपद्वारे पाळण्यातील बाळाचा व्हिडिओ देखील पाहता येतो आणि ‘स्मार्ट क्रिब’कडून येणाऱ्या सूचना पाहता येतात. आवश्यक असेल तेंव्हा बाळाला झोके देणे सोबतीला संथ संगीत आणि बाळाच्या हालचालीवर लक्ष ढेवणारा स्मार्ट मॉनिटर या पाळण्याला खऱ्याअर्थाने स्मार्ट बनवतात.

‘स्मार्ट क्रिब’ (पाळणा) लाईटवर चालतो. स्मार्ट मॉनिटरच्या मदतीने बाळ उठणार असेल तर त्याला पुन्हा झोपवण्यास मदत करते आणि बाळ झोपले कि झोके आपोआप बंद होतात. आधुनिक जगात स्मार्ट पालकत्वासाठी स्मार्ट क्रिब अतिशय उपयोगी ठरेल, असे मत राधिका पाटील यांनी मांडले.

आमच्या या संशोधनासाठी भारतातून खूप प्रोत्साहन आणि मदत मिळाली आणि थोड्याच दिवसात हा पाळणा भारतात देखील उपलब्ध होईल. आधुनिक जगात ज्यावेळी आपल्याकडे सर्व गोष्टींचं नियोजन करण्यासाठी फार कमी वेळ असतो अशात मुलांसाठी जास्त वेळ देता येत नाही हि प्रत्येक पालकाची समस्या आहे. हा पाळणा बाळाला आवश्यक असलेली विनाव्यतय शांत झोप आणि पालकांसाठी मनाची शांतता दोन्ही पुरवते, असे राधिका पाटील म्हणाल्या.

 कोण आहेत राधिका आणि भरत ?

राधिका आणि भरत हे दोघेही अभियंता असून दोघांनीही बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था (IISC) येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदव्यूत्तर पदवी घेतली आहे. दोघांनीही दहावर्षाहून अधिक काळ बंगळुरू येथील एका सेमीकंडक्टर कंपनीत काम केले. स्मार्ट क्रिबच्या निमित्ताने त्यांनी कोरोनाचे सर्व जगात थैमान सुरु असताना ऐन जुलैमध्ये अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली गाठली.

त्याठिकाणी ‘क्रेडलवाईज’ कंपनी स्थापन केली व स्मार्ट क्रिब हे पाहिलं उत्पादन त्यांनी सर्वांसाठी उपलब्ध केले आहे. times.com ने ‘क्रेडलवाईज’च्या स्मार्ट क्रिबची दखल घेऊन त्यांना जगातील शंभर उत्कृष्ठ संशोधनाच्या यादीत स्थान दिले आहे. लवकरच हा स्मार्ट पाळणा भारतात देखील उपलब्ध होईल असे राधिका पाटील म्हणाल्या.

 राधिका पाटील यांचं निगडी कनेक्शन !

राधिका पाटील यांचा जन्म मुंबईत झाला. मात्र, त्यांचं बालपण निगडी येथे गेलं. प्राधिकरणातील प्रसिद्ध डॉक्टर नितीन गांधी यांच्या त्या कन्या आहेत. निगडीतील सेंट उर्सुला उच्च माध्यमिक शाळेत त्यांचं दहावी पर्यंत शिक्षण झालं, तर पुण्यातील आपटे प्रशालेत त्यांनी अकरावी व बारावीचे शिक्षण घेतले.

‘सीओईपी’ या अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन या विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली व त्यानंतर त्यांनी बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था (IISC) येथून इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदव्यूत्तर पदवी घेतली आहे.

राधिका पाटील यांनी मोठ्ठ यश मिळवलं असलं तरी त्या आपल्या शिक्षकांना त्या विसरल्या नाहीत. शाळेत असताना अलका भाटे यांनी, तर अभियांत्रिकीच शिक्षण घेत असताना चिंचवड मधील गणिताचे प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी खूप मदत केली, असं त्या आवर्जून सांगतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.