Chinchwad : निर्जन स्थळांवर सीसीटीव्हीचा वॉच; पिंपरी-चिंचवड पोलिसांचा स्मार्ट पोलिसिंगवर भर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून निर्जन स्थळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. निर्जनस्थळी लाईट तसेच सीसीटीव्ही बसवून निगराणी ठेवण्यात येणार आहे. शहरातील बहुतांश गुन्हेगारीच्या घटना निर्जनस्थळी होत असल्यामुळे पोलिसांनी निर्जन स्थळांवर स्मार्ट पद्धतीने निगराणी ठेवण्याचे काम हाती घेतले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील क्राईम ट्रेंडची आकडेवारी काढत आहेत. प्रत्येक गुन्ह्याच्या बाबतीत मागील तीन ते पाच वर्षातील हॉटस्पॉट देखील शोधले जात आहेत. यातून पोलिसिंग बाबतची पुढील धोरणे बनवली जाणार आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा मागील तीन आठवड्यांपासून या कामी लागले आहेत.

कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या प्रकारचे गुन्हे होतात याचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतींचाही अभ्यास केला जात आहे. भविष्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी याची पोलिसांना मदत होणार आहे. तसेच सीसीटीव्हीचे जाळे निर्माण करणे, वाहनांवरून पेट्रोलिंग वाढवण्यासाठी प्रयत्न करणे देखील सुरू आहे.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले की, ‘पिंपरी चिंचवड पोलिसांनी निर्जन स्थळांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. निर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना सांगण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत.’

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड महापालिका, चाकण नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, तळेगाव नगरपरिषद या भागांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या हद्दीतील निर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पथदिवे बसविण्यासाठी सांगितले जाणार असून भविष्यात स्मार्ट पोलिसिंगवर भर दिला जाणार असल्याचे कृष्णप्रकाश यांनी सांगितले.

सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात मनुष्यबळाची कमतरता आहे. पोलीस आयुक्तालय नवीन असून आयुक्तालयासाठी तीन टप्प्यात मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे मनुष्यबळ सध्या उपलब्ध आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मनुष्यबळासाठी पोलीस भरती घेतली जाणार आहे.

मागील दोन वर्षात कोरोना साथीचा प्रादुर्भाव असल्याने पोलीस भरती प्रक्रिया रखडली आहे, मात्र आगामी काळात लवकरात लवकर भरती प्रक्रिया देखील राबवली जाणार आहे. यामुळे मनुष्यबळाची कमतरता काही प्रमाणात सुटेल. मनुष्यबळ आणि स्मार्ट पोलीसिंग यांच्या माध्यमातून भविष्यात गुन्हेगारीला आळा घातला जाणार असल्याचेही आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.