Talegaon News : व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणाला स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचा आधार

एमपीसी न्यूज – व्यसनाच्या आहारी गेलेल्या छत्तीसगढ येथील एका तरुणाला उर्से येथील स्माईल व्यसनमुक्ती केंद्राने आधार दिला आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन भरकटलेल्या तरुणाला किनारा वृद्धाश्रम आणि स्माईल व्यसनमुक्ती केंद्राने योग्य मार्ग दाखवला आहे.

राजेश श्रीनिवास (वय 29, रा. विलासपूर, छत्तीसगढ) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, राजेश कामशेत येथील पवना रोडवर भटकत होता. किनारा वृद्धाश्रमाच्या संचालिका प्रीती वैद्य यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी राजेशशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजेश खूप घाबरला. संचालिका वैद्य यांनी राजेशला त्यांच्या किनारा वृद्धाश्रमात आणले. त्याला अंघोळ घालून, स्वच्छ कपडे देऊन त्याच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण कायापालट केला.

त्याची आरोग्य तपासणी केली. त्यात तो मागील काही दिवसांपासून जेवला नसल्याचे आढळले. त्याची कामशेत पोलीस ठाण्यात नोंद करून त्याला उर्से येथील स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात आले.

स्माईल व्यसनमुक्ती केंद्राची उर्से येथे नवीन शाखा सुरु झाली आहे. या केन्द्रात 30 बेड रस्त्यावरील निराधार व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात आल्या असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष हर्षल पंडित यांनी दिली. प्रीती वैद्य, स्माईलचे अमोल कुलकर्णी, सचिन कांबळे, प्रशांत कारजुले, हेमंत सोमण, मुरली कट्टा यावेळी उपस्थित होते.

रस्त्यावर भरकटलेले व्यसनी आढळून आल्यास त्या व्यक्तींच्या बाबत स्माईल व्यसनमुक्ती केंद्राशी संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

स्माईल सोशल फाउंडेशन

मु पो आंबेवाडी, उर्से, ता. मावळ

संपर्क – 9673728192

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.