_MPC_DIR_MPU_III

Pimpri : दोन महिन्यात पाणीपुरवठा सुरळित करा, महापौरांचा आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील नियोजनासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आयुक्तांनी तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी दिवसाआड पाणी देण्याचा उपाय सुचविला आहे. यासाठी त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, असल्याचे सांगत दोन महिन्यात पाणीपुरवठा सुरळित करण्याचे आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

एकदिवसाआड पाणीपुरवठ्याच्या निर्णयावर महासभेत चार तास चर्चा झाली. 24 नगरसेवकांनी या चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर महापौरांनी दोन महिन्यात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत.

मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही पाणीकपात पूर्णपणे चुकीची आहे. पाणीकपात मागे घेण्यात यावी.

_MPC_DIR_MPU_II

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, पाणीपुरवठ्याबाबत केवळ प्रयोग केले जात आहेत. कधी दिवसाआड तर कधी आठवड्यातून बंद, असे प्रयोग केले जात आहेत. यामध्ये करदात्या जनतेला वेठीस धरले जात आहे. किती दिवस शहराने असे प्रयोग पहायचे. पाणी टंचाई दिसू लागली की बांधकाम व्यावसायिकांना पाणी देऊ नका आडे फर्मान सोडले जाते. मात्र, हेच व्यावसायिक डेव्हलपमेंट चार्जच्या मोबदल्यात कोट्यावधी रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा करतात.

विरोधी पक्षनेते नाना काटे म्हणाले, पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणी टंचाई आहे का? पाणीकपातीला राष्ट्रवादीचा विरोध आहे.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, पवना धरण 100 टक्के भरले आहे हे सत्य आहे. परंतु, पाणी उचलण्याची व्यवस्था कोण करणार? पाण्याच्या प्रश्नावर वारंवार चर्चा होते. मात्र, त्यावर ठोस उपाययोजना होत नाही. पाण्याच्या विषयावर राजकीय कुरघोडी करण्यापेक्षा शहराच्या भविष्यातील 25 वर्षाच्या नियोजनाची अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे. यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील. कामात दिरंगाई, काम न करण्याऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा. जाणीवपूर्वक टीका करण्यात अर्थ नाही.

शहरातील नागरिकांची फसवणूक करायची नसेल तर त्यांना वास्तव सांगितले पाहिजे. मात्र, सदस्य राजकीय स्टंटबाजी करीत आहेत. आयुक्तांनी नियोजन करावे. त्यांनी सुचविलेल्या उपाययोजनाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा अधिक ताकदीने कामाला लावा, अशी सूचनाही पवार यांनी प्रशासनाला केली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.