Pune News : …म्हणून मी नथुराम गोडसे साकारण्याचा निर्णय घेतला, खासदार कोल्हे यांचं स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे आपल्या एका भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मैने गांधी को क्यू मारा या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा या महिन्याच्या अखेरीस कोटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

परंतु खासदार कोल्हे यांनी साकारलेल्या या भूमिकेवरून आता वादळ निर्माण झाले. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच त्यांच्या या भूमिकेला विरोध होतोय. त्यानंतर खासदार कोल्हे यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्या या भूमिकेविषयी स्पष्टीकरण दिले.

मी आणि नथुराम गोडसे ही भूमिका: –

2017 साली केलेला “Why I killed  Gandhi” हा सिनेमा Limelight या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असं समजलं आणि अनेकांनी विचारलं डाॅक्टर तुम्ही नथुराम गोडसे या भूमिकेत? उत्तरादाखल मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं- “हा महाराष्ट्र कीर्तनानं पूर्णपणे घडला नाही आणि तमाशानं पूर्णपणे बिघडला नाही!”  या वाक्यातील नकारात्मक सूर बाजूला ठेवला तर मला या वाक्यात एक सकारात्मक गोष्ट जाणवते ती म्हणजे “Reel लाईफ” आणि “Real लाईफ” यातील फरक स्पष्ट करणारी सीमारेषा अधोरेखित करणं.

कलाकार म्हणून भूमिका साकारत असताना काही भूमिका आव्हानात्मक असतातच आणि त्यांच्या विचारधारेशी सुद्धा आपण सहमत असतो आणि त्या साकारताना समाधानही मिळतं परंतु काही अशा भूमिका अचानक समोर येतात ज्या विचारधारेशी आपण सहमत नसतो पण कलाकार म्हणून त्या आव्हानात्मक असतात. अशीच ही भूमिका नथुराम गोडसे. मी व्यक्तिगत पातळीवर गांधीजींची हत्या तसेच नथुराम उदात्तीकरण या दोन्हीसाठी समर्थक नाही तरी समोर आलेल्या भूमिकेस न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर आणि व्यक्ती म्हणून विचारस्वातंत्र्याचा!

याच मनमोकळेपणाने आपण या कलाकृतीकडे पहावं ही अपेक्षा!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.